अमेरिका-दक्षिण कोरिया ‘टू प्लस टू’ चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर कोरियाने अमेरिकेचा वाटाघाटींचा प्रस्ताव धुडकावला

प्योनग्यँग/सेऊल/वॉशिंग्टन – अमेरिका व दक्षिण कोरियात पार पडलेल्या ‘टू प्लस टू’ स्तरावरील बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर कोरियाने अमेरिकेचा चर्चेचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. गुरुवारी अमेरिका व दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीत, उत्तर कोरिया अण्वस्त्रमुक्त करणे हे प्रमुख उद्दिष्ट राहिल, असे जाहीर करण्यात आले होते. त्यापूर्वीच अमेरिकेच्या वेळकाढूपणाच्या क्लृप्तीला प्रतिसाद देण्याची आवश्यकता वाटत नाही, असे उत्तर कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले आहे. बुधवारी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन आणि संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये दाखल झाले. त्यांनी दक्षिण कोरियाचे परराष्ट्रमंत्री चुंग इयु-वाँग व संरक्षणमंत्री सुह वुक यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केली. या बैठकीनंतर परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी बैठकीत झालेल्या चर्चेसंदर्भात माहिती दिली. ‘अमेरिका व दक्षिण कोरिया हे दोन्ही देश उत्तर कोरियाला अण्वस्त्रमुक्त करण्यासाठी वचनबद्ध आहेत’, असे अमेरिकी परराष्ट्रमंत्री म्हणाले. उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांपासून अमेरिका व सहकारी देशांना धोका असल्याचे नमूद करून हा धोका कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही ब्लिंकन यांनी सांगितले.

यावेळी अमेरिकेने चीनलाही या प्रयत्नांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. ‘चीन व उत्तर कोरियामध्ये असलेल्या विशेष संबंधांचा वापर करून चीनने त्या देशावर दडपण टाकावे. ही बाब चीनच्या हितसंबंधांच्या दृष्टीनेही योग्य ठरेल’, असा सल्ला अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी दिला. अमेरिका व चीनदरम्यान येत्या काही तासात अलास्कामध्ये उच्चस्तरीय बैठक होत आहे. या पार्श्‍वभूमीवर परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी दिलेला हा सल्ला लक्ष वेधून घेणारा ठरतो.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला भेट देऊन मोठे पाऊल उचलले होते. मात्र दक्षिण कोरियाबरोबरील संरक्षण सहकार्य व इतर मुद्यांच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका व उत्तर कोरियामधील संभाव्य करार फिस्कटला होता. यामागे चीनचा हात असल्याचे आरोपही झाले होते. उत्तर कोरियाच्या राजवटीवर सर्वाधिक प्रभाव असणारा देश म्हणून चीन ओळखला जातो. उत्तर कोरियाकडे असलेल्या अण्वस्त्रांमागील तंत्रज्ञान व इतर सहाय्यही चीननेच पुरविल्याचे मानले जाते. अर्थसहाय्य, अन्नधान्याचा पुरवठा यासह अनेक मार्गांनी चीन उत्तर कोरियावरील आपला प्रभाव टिकवून आहे.

सध्या अमेरिका व चीनमधील संबंध तणावाचे आहेत. अमेरिकेने चीन हाच सर्वात मोठा धोका असल्याचे जाहीर केले असून साऊथ चायना सीसह इतर अनेक मुद्यांवर चीनविरोधात आक्रमक पावले उचलण्याचे संकेतही दिले आहेत. त्यामुळे उत्तर कोरियातील ‘डिन्यूक्लिअरायझेशन’साठी अमेरिकेने चीनला आवाहन करणे महत्त्वाचे ठरते.

दरम्यान, उत्तर कोरियाने मात्र आपली हटवादी भूमिका कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिका व दक्षिण कोरियामध्ये चर्चा सुरू असतानाच उत्तर कोरियाने अमेरिकेचा वाटाघाटींचा प्रस्ताव धुडकावला आहे. ‘अमेरिकेच्या वेळकाढूपणाच्या क्लृप्तीला प्रतिसाद देण्याची आवश्यकता वाटत नाही. अमेरिकेने उत्तर कोरियाविरोधातील आक्रमक धोरण मागे घेतल्याशिवाय आम्ही चर्चा करणार नाही. ही बाब यापूर्वीच स्पष्ट करण्यात आली आहे’, या शब्दात उत्तर कोरियाच्या परराष्ट्रमंत्री चोए सॉन हुई यांनी अमेरिकेला प्रत्युत्तर दिले. दोन दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग-उन यांची बहिण ‘किम यो जाँग’ यांनी अमेरिकेला धमकावले होते.

leave a reply