पाकिस्तानच्या कराचीत बलोच बंडखोरांचा हल्ला – सात ठार

कराची – पाकिस्तानच्या कराची शहरातील स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीवर हल्लेखोरांनी चढविलेल्या हल्ल्यात सात जण ठार झाले. ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ (बीएलए) या पाकिस्तानातील बंडखोर गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पाकिस्तानी पोलिसांच्या कारवाईत मारले जाण्याच्या आधी या बंडखोरांनी ‘बलुचिस्तान जिंदाबाद’ आणि ‘सिंधुदेश जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानातील ‘स्वतंत्र बलुचिस्तान’ आणि ‘स्वतंत्र सिंधुदेश’ चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Pakistan-Karachiपाकिस्तानची आर्थिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कराची शहरातील शेअर बाजाराच्या इमारतीवर सोमवारी सकाळी हल्ला झाला. या हल्ल्यात एक पोलिस जवान आणि दोन सुरक्षारक्षक ठार झाले. पुढच्या काही मिनिटात पाकिस्तानच्या पोलिसांनी या इमारतीला घेराव टाकून केलेल्या कारवाईत चारही हल्लेखोर ठार केले. पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘बीएलए’च्या ‘माजिद ब्रिगेड’ने हा हल्ला घडविल्याचा आरोप पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. बलोच बंडखोरांनी कराची शहरात चढविलेला हा दुसरा हल्ला ठरतो. याआधी २०१८ साली बलोच बंडखोरांनी कराचीतील चीनच्या दूतावासावर हल्ला चढविला होता.

या हल्ल्याच्या निमित्ताने स्वतंत्र बलुचिस्तान आणि स्वतंत्र सिंधूदेश हे दोन्ही मुद्दे पुन्हा चर्चेत आले आहेत. गेल्या काही दशकांपासून पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि सिंध प्रांतातून स्वातंत्र्याची हाक दिली जात आहे. स्वतंत्र बलुचिस्तानसाठी बलोच बंडखोरांनी पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात संघर्ष पुकारला आहे. या बलोच बंडखोरांना भारताचे सहाय्य असल्याचा आरोप पाकिस्तानी यंत्रणा करीत आहेत. भारताप्रमाणे अफगाणिस्तान देखील बलोच बंडखोरांचा आपल्याविरोधात वापर करीत असल्याचा ठपका पाकिस्तानने ठेवला आहे. पण भारत आणि अफगाणिस्तानने पाकिस्तानचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्याचबरोबर पाकिस्तान बलोच नागरिकांचे अधिकार पायदळी तुडवित असल्याचा आरोप भारताने केला आहे.

Pakistan-Karachiदरम्यान, याआधी बलुचिस्तानमधील पाकिस्तानी सैनिकांवर तसेच चिनी कंत्राटदारांवर बलोच बंडखोरांनी हल्ले चढविले आहेत. बलुचिस्तानच्या ग्वादर बंदरातील चीनची गुंतवणूक व या बंदराचे लष्करीकरण याला बलोच बंडखोरांचा कडवा विरोध आहे. हा विरोध दर्शविण्यासाठी बलोच बंडखोरांकडून चिनी प्रकल्पांवर तसेच चिनी कर्मचाऱ्यांवर हल्ले चढविले जातात. तर गेल्या वर्षी बलोच बंडखोरांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना इशाराही दिला होता. बलुचिस्तान हा स्वतंत्र देश असून जिनपिंग यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना इथून काढून घ्यावे. अन्यथा त्यांना बलोच जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल’, अशी धमकी बलोच बंडखोरांनी दिली होती.

leave a reply