पीओकेवरील भारताच्या हल्ल्याच्या भितीने पाकिस्तानची गाळण उडाली

श्रीनगर/इस्लामाबाद – भारताने हल्ला चढविला तर अण्वस्त्रधारी पाकिस्तान त्याला जबरदस्त प्रत्युत्तर देईल, अशा वल्गना पाकिस्तानकडून सातत्याने केल्या जातात. पण भारतीय लष्कराच्या हल्ल्याच्या शक्यतेने पाकिस्तानची गाळण उडाल्याचे समोर आले आहे. जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांनी आपल्या जनतेला दोन महिने पुरेल इतका सिलेंडरचा साठा करुन ठेवण्याची सूचना केली होती. ही सूचना म्हणजे भारताने पाकिस्तानव्याप्त काश्मीरवर(पीओके) हल्ला चढविण्याची केलेली तयारीच असल्याचा समज पाकिस्तानने करुन घेतला आहे. यानंतर पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये घबरहाट पसरल्याचे दिसू लागले होते. मात्र पावसाळयाच्या काळात सिलेंडरचा साठा करण्याची जम्मू-काश्मीरच्या जनतेला दिलेली सूचना सर्वसामान्य प्रशासकीय व्यवस्थेचा भाग होता, असा खुलासा जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांनी केला आहे. मात्र यामुळे पाकिस्तानची झालेली अवस्था भारतीयांच्या थट्टेचा विषय बनली आहे.

POKगेल्या काही महिन्यांपासून पीओकेवर भारत हल्ला चढविण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या पाकिस्तानची माध्यमे देत आहेत. दहशतवादी हल्ला घडवून आणून भारत पीओके ताब्यात घेण्याचा प्रयत्न करील, अशी भिती पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली होती. त्याचवेळी भारताच्या हल्ल्याला पाकिस्तान सर्वशक्तिनिशी प्रत्युत्तर देईल,असे दावे इम्रान खान यांनी केले होते. पाकिस्तानची माध्यमे व कट्टरपंथीय विश्लेषक तर आपल्या देशात युद्धज्वर पसरुन भारताच्या विरोधात गरळ ओकत आहे. यावेळी भारताशी आरपारची लढाई होईल,असे पाकिस्तानातील भारतद्वेष्टे विश्लेषक सांगत आहेत. पाकिस्तानच्या लष्कराकडूनही भारताच्या विरोधात गर्जना केल्या जातात. मात्र भारताच्या हल्ल्याची शक्यता ही पाकिस्तानची भितीने गाळण उडविणारी ठरते, हे आता सिद्ध झाले आहे. पावसाळ्याच्या काळात जम्मू-काश्मीरच्या जनतेने दोन सिलेंडरची तयारी ठेवावी, अशी सूचना जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांनी केली होती. त्याचा संबंध पाकिस्तानने युद्धाच्या तयारीशी जोडला आहे. यानंतर पाकिस्तानची माध्यमे युद्ध झाले तर काय होईल अशी भितीयुक्त स्वरात चर्चा करु लागली आहेत.भारत एकाचवेळी चीनसारखा प्रबळ देश आणि पाकिस्तान दोन्ही आघाड्यांवर आक्रमक कसा होऊ शकतो? असा प्रश्न पाकिस्तानच्या वृत्तवाहिन्यांवरील अँकर्स आपल्या विश्लेषकांना विचारत आहेत. भारताला युद्धाच्या भीषण परिणामांची पर्वा नाही का? असाही प्रश्न काही अँन्कर्सनी विश्लेषकांना विचारला होता. युद्धाने काश्मीरचा प्रश्न सुटणार नाही. भारताने पाकिस्तानशी चर्चा करुन हा प्रश्न सोडवावा, असा सल्लाही भेदरलेली पाकिस्तानी माध्यमे देऊ लागली आहेत.

पाकिस्तानचे लष्कर तर लग्नाचे शुटिंग करणारे ड्रोन पाडून ते भारताचे असल्याचा दावा ठोकू लागले आहेत. याक्षणी पाकिस्तानच्या आजी-माजी लष्करी अधिकांऱ्यानी भारताबरोबर युद्धाची भाषा करण्याऐवजी शांततेचा पुरस्कार का सुरु केला आहे? असा प्रश्न या देशाच्या पत्रकारांनाही पडू लागला आहे. भारताने कलम ३७० हटवून जम्मू-काश्मीरवरील आपली पकड भक्कम केलेली असताना पाकिस्तानचे लष्कर व सरकार काहीही करु शकले नाही, अशी खंत या प्रश्नामागे आहे. याला उत्तर देताना पाकिस्तानच्या लष्करी अधिकांऱ्यानी काश्मिरी जनता भारताच्या बाजूने उभी राहिल्याचे सांगून असे भाबडे प्रश्न करणांऱ्याना मोठा धक्का दिला. त्याचवेळी भारताचा सामना करण्याची ताकद पाकिस्तानकडे राहिलेली नाही, याचीही कबुली हताशपणे दिली. यामुळे भारत आणि चीनचे युद्ध पेटेल आणि त्यामुळे पीओके व पाकिस्तानचा बचाव होईल, असा समज करुन घेऊन पाकिस्तान भारत चीन सीमावादाकडे आशाळभूतपणे पाहत आहे.

leave a reply