केंद्रीय गृहमंत्रालयाकडून “अनलॉक २.०” संदर्भांत घोषणा

महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन ३१ जुलै पर्यंत वाढविला

नवी दिल्ली/मुंबई – भारतातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या २४ तासात सुमारे २० हजाराने वाढली आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाचे इतके रूग्ण सापडल्याने चिंता वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊनच्या पुढच्या टप्प्यात शिथिल करण्यात येणाऱ्या नियमांसंदर्भात सूचना जारी केल्या आहेत. यानुसार शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृह, जिम, मेट्रो रेल्वे ३१ जुलै पर्यंत बंदच राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी यासंदर्भात देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. corona unlock 2.0

देशात सलग तिसऱ्या दिवशी सुमारे २० हजार रूग्णांची नोंद करण्यात आल्याने देशातील कोरोनाच्या रूग्णांची संख्या ५ लाख ६५ हजारांवर पोहोचली आहे. सोमवारी महाराष्ट्रात १८१ जणांचा बळी गेला आणि ५,२५७ नवे रूग्ण आढळले. यामुळे राज्यातील या साथीच्या रूग्णांची संख्या १ लाख ७० हजारांजवळ पोहोचली आहे. महाराष्ट्रानंतर तमिळनाडूत २४ तासात सर्वाधिक रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तमिळनाडूत एका दिवसात ६२ जण दगावले असून ३,९४९ नवे रूग्ण आढळले आहेत.

दिल्लीत २,०८४ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.  यामुळे या राज्यातील एकूण रूग्णांची संख्या ८५ हजारांवर पोहोचली आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक, हरियाणा, तेलंगणा, आंध्रप्रदेश, या राज्यातही कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसुन आली आहे. मध्य प्रदेश आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातील रुग्णसंख्या १३ हजारांच्यावर पोहोचली आहे. 

या पार्श्वभूमीवर काही राज्यांकडून लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी पश्चिम बंगालने लॉकडाऊन ३१ जुलै पर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. माणिपुरने १५ जुलै पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता नागालँड ने १५ जुलै पर्यंत, महाराष्ट्र आणि तमिळनाडूने ३१ जुलै पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये नियम आणखी शिथिल केले जाणार नाहीत, असे संकेत या राज्यांनी दिले आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाने “अनलॉक २.०” संदर्भात सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार कंटेनमेंट झोन सोडून सर्व दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र शाळा, महाविद्यालये, इतर शैक्षणिक संस्था, आंतरराष्ट्रीय विमानसेवा, मेट्रो रेल्वे, इंटरटेन्मेन्ट पार्क, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम या गोष्टींवरील निर्बंध कायम राहाणार आहे. तसेच रात्री १० ते सकाळी ५ पर्यंत अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडण्यास मनाई असेल असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, जगभरातील कोरोना व्हायरसच्या रूग्णांची संख्या १ कोटी ३ लाखांवर पोहोचली आहे. तसेच ५६ लाख रूग्ण आतापर्यंत बरे झाल्याचे वल्डोमीटर या वेबसाईटने जाहीर केले आहे.

leave a reply