बलोच बंडखोरांनी पाकिस्तानच्या ग्वादरमधील जिना यांचा पुतळा उडवून दिला

कराची- रविवारी पाकिस्तानच्या बलोचिस्तान प्रांतातील ग्वादर शहरात बलोच बंडखोरांनी पाकिस्तानचे संस्थापक ‘मोहम्मद अली जिना’ यांचा पुतळा स्फोटाद्वारे उडवून दिला. ‘बलोच रिपब्लिकन आर्मी’ने (बीआरए) या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली. जिना आणि त्यांच्या विचारधारेला बलोचिस्तानात स्थान नाही, असे सांगून ‘बीआरए’ने या कृत्याचे समर्थन केले. तर रविवारी दुसर्‍या एका घटनेत ‘बलोच लिब्रेशन आर्मी’ने (बीएलए) हल्ला चढवून बलोचिस्तानमध्ये तैनात असलेल्या पाकिस्तानी लष्कराचे चार जवान ठार केले.

बलोच बंडखोरांनी पाकिस्तानच्या ग्वादरमधील जिना यांचा पुतळा उडवून दिलाजून महिन्यात बलोचिस्तानच्या ग्वादरमधील मरीन ड्राईव्हच्या सागरी किनार्‍यावर जिना यांचा पुतळा उभारण्यात आला होता. रविवारी सकाळी ‘बीआरए’ने पुतळ्याभोवती स्फोटके पेरुन स्फोट घडविला. सुरुवातीला पाकिस्तानच्या माध्यमांनी याबाबतच्या बातम्यांना प्रसिद्धी दिली नव्हती. मात्र सोशल मीडियावर त्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाल्यावर पाकिस्तानी माध्यमांना त्याची बातमी देणे भाग पडले. पाकिस्तानी जनता यावर संताप व्यक्त करीत आहेत. तर बलोच जनता याचे स्वागत करीत आहे.

‘याचा उच्चस्तरीय तपास केला जाईल. पण अद्याप यासाठी कोणालाही अटक झालेली नाही. एक ते दोन दिवसात दोषींवर कठोर कारवाई होईल’, असे ग्वादरचे उपायुक्त निवृत्त मेजर अब्दुल कबिर खान म्हणाले. ग्वादरमधील जिना यांच्या पुतळ्यावरचा हल्ला हा पाकिस्तानच्या विचारधारेवरचा हल्ला ठरतो. त्यामुळे यंत्रणेने हा अपराध करणारंना कडक शिक्षा द्यावी अशी मागणी बलोचिस्तानचे माजी गृहमंत्री आणि संसद सदस्य सरफराज बुग्ती यांनी केली. याआधी २०१३ साली बलोच बंडखोरांनी जिना राहत असलेल्या १२१ वर्ष जुन्या इमारतीला लक्ष्य केले होते. बलोच बंडखोरांनी या इमारतीत स्फोट घडवून ती नष्ट केली होती.

दरम्यान, रविवारी ‘बीएलए’ने बलोचिस्तानमधील पाकिस्तानी निमलष्करी दलाचे वाहन शक्तीशाली स्फोटाद्वारे उडवून दिले. आयईडी स्फोटकाद्वारे घडवून आणलेल्या या घातपातात चार पाकिस्तानी जवान ठार झाले. तर दोन अधिकारी जखमी झाले आहेत. त्याआधी शुक्रवारी बलोचिस्तानच्या आवरन येथे बलोच बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे दोन सुरक्षारक्षक ठार झाले असून पाच जण जखमी झाले आहेत. बलोची बंडखोरांना तालिबानी दहशतवादी मिळाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. दोघे मिळून पाकिस्तानी लष्करावर हल्ले करीत असल्याचे दावे केले जातात. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराच्या चिंता वाढल्या आहेत.

leave a reply