ब्रिटीश विनाशिकेच्या तैवान मोहिमेवरून चीनचे टीकास्त्र

टीकास्त्रबीजिंग/लंडन/तैपेई – सोमवारी ब्रिटनची विनाशिका ‘एचएमएस रिचमंड’ने तैवानच्या सागरी क्षेत्रातून प्रवास केला. ब्रिटनच्या विनाशिकेने स्वतंत्ररित्या तैवाननजिकच्या क्षेत्रात मोहीम राबविण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. ब्रिटनच्या या मोहिमेने चीन चांगलाच बिथरला असून, ब्रिटीश विनाशिकेची गस्त सैतानी उद्दिष्टांचे प्रतीक असल्याचे टीकास्त्र सोडले आहे.

ब्रिटनची विमानवाहू युद्धनौका ‘एचएमएस क्वीन एलिझाबेथ’ व ‘कॅरिअर स्ट्राईक ग्रुप’ सध्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रात तैनात आहे. ‘एचएमएस रिचमंड’ ही विनाशिका याच ताफ्याचा भाग आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटनची विमानवाहू युद्धनौका व तिचा ताफा जपान दौर्‍यावर होता. त्यातून ‘एचएमएस रिचमंड’ वेगळी झाली असून ती व्हिएतनामला भेट देणार आहे. या भेटीवर जात असतानाच ब्रिटीश विनाशिकेने सोमवारी तैवानच्या सामुद्रधुनीतून प्रवास केला. ब्रिटीश विनाशिकेच्या अधिकार्‍यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून याची माहिती दिली.

टीकास्त्रब्रिटीश विनाशिकेची मोहीम व त्याचे उघडपणे केलेले समर्थन यामुळे चीन बिथरला आहे. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या ईस्टर्न थिएटर कमांडने ब्रिटीश विनाशिकेच्या मोहिमेवर टीकास्त्र सोडले. ‘ब्रिटीश विनाशिकेची मोहीम ब्रिटनची सैतानी उद्दिष्टे दाखवून देणारी आहे. त्यामुळे तैवानच्या सागरी क्षेत्रातील शांतता व स्थैर्याला धक्का बसला आहे’, अशी प्रतिक्रिया चीनच्या कमांडने दिली आहे. त्याचवेळी चीनची ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ ऍलर्टवर असून ब्रिटीश विनाशिकेला इशारा देण्यासाठी लढाऊ विमाने तसेच युद्धनौका धाडल्याचा दावाही करण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षात चीनच्या विस्तारवादी हालचाली वाढल्या असून साऊथ चायना सी, ईस्ट चायना सीसह संपूर्ण पॅसिफिक क्षेत्रावरील प्रभाव वाढविण्यासाठी आक्रमक धोरण राबविण्यात येत आहे. चीनची आक्रमकता रोखण्यासाठी अमेरिकी नौदलाने पुढाकार घेतला असून इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सहकारी देशांसह युरोपातील मित्रदेशांनाही अधिक सक्रिय होण्यासाठी आवाहन केले आहे.

टीकास्त्रत्यानंतर फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन यासारख्या देशांनी इंडो-पॅसिफिकमधील आपल्या हालचाली वाढविण्याचे संकेत दिले होते. या देशांनी त्यासाठी स्वतंत्र धोरणही जाहीर केले असून ‘फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन’चा मुद्दा पुढे करून संरक्षण तैनातीचे संकेत दिले आहेत. ब्रिटीश विनाशिकेने तैवानच्या सागरी क्षेत्रातून केलेला प्रवास व व्हिएतनामची भेट त्याचाच भाग आहे. याव्यतिरिक्त ब्रिटनने आपल्या दोन युद्धनौका इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील कायमस्वरुपी तैनातीसाठी रवाना केल्याची माहितीही सूत्रांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, चीनच्या वाढत्या वर्चस्ववादी हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर तैवानच्या संरक्षणदलांना अचूक मारा करणार्‍या दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची आवश्यकता असल्याचा दावा संरक्षणमंत्री चिऊ कुओ-चेंग यांनी केला. तैवान सरकार स्थानिक पातळीवर दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठीही प्रयत्न करीत असून अमेरिकेबरोबरही बोलणी सुरू असल्याचे सांगण्यात येते. तैवानच्या सरकारने यावर्षीच्या संरक्षणखर्चात अतिरिक्त निधीची तरतूदही केली असून त्यात नव्या क्षेपणास्त्रांच्या खरेदीचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

leave a reply