संरक्षणासाठी गुंतवणूक केली नसती तर भारताला डोकलाम व गलवानमध्ये हार स्वीकारावी लागली असती

- उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मोहान्ती

नवी दिल्ली – आपल्या संरक्षणासाठी आवश्यक ती गुंतवणूक केली नसती, तर डोकलाम आणि गलवानमध्ये भारताला हार स्वीकारावी लागली असती, असे उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल सीपी मोहान्ती यांनी म्हटले आहे. डोकलाम व गलवानमध्ये झालेल्या संघर्षात विजय मिळाल्याने भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठा वाढली, असे उपलष्करप्रमुख पुढे म्हणाले. एका कार्यक्रमात बोलताना उपलष्करप्रमुखांनी संरक्षणसाठी अत्यावश्यक असलेल्या गुंतवणुकीचे महत्त्व अधोरेखित करून भारताच्या या गुंतवणुकीमुळे जम्मू व काश्मीरच्या सुरक्षेसह नक्षलवादाची समस्याही यामुळे नियंत्रणात आल्याचे स्पष्ट केले.

संरक्षणासाठी गुंतवणूक केली नसती तर भारताला डोकलाम व गलवानमध्ये हार स्वीकारावी लागली असती - उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मोहान्तीकाही दिवसांपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी देखील गलवानमध्ये आक्रमण करणार्‍या शक्तींना भारताने चांगलाच धडा शिकविल्याचे म्हटले होते. आपल्या सार्वभौमत्त्वाला आव्हान देणार्‍यांची भारत गय करणार नाही, हा संदेश यामुळे जगाला मिळाला होता, असे सांगून राजनाथ सिंग यांनी याद्वारे चीनला इशारा दिला होता. त्यानंतर आता उपलष्करप्रमुखांनी चीनबरोबर झालेल्या डोकलाम व गलवानमधील संघर्षाचा दाखला दिला, ही लक्षवेधी बाब ठरते.

डोकलाम व गलवानमध्ये झालेल्या संघर्षात भारताने चीनच्या विरोधात कठोर भूमिका स्वीकारली होती. या संघर्षात भारताचा विजय झाला आणि त्याचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटले. यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठा अधिकच वाढली, असे उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मोहान्ती म्हणाले.

आजच्या काळात भारत हा संपूर्ण सुरक्षा पुरविणारा देश म्हणून ओळखला जात आहे, याचा दाखला उपलष्करप्रमुखांनी दिला. अमेरिका व फ्रान्स या देशांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी हिंदी महासागर व त्यापलिकडील क्षेत्रात नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर अर्थात संपूर्ण सुरक्षा पुरविणारा देश अशा शब्दात भारताची प्रशंसा केली होती.

२०१७ साली डोकलाममधील भूतानच्या सीमेत घुसखोरी करू पाहणार्‍या चीनच्या लष्कराला भारतीय सैनिकांनी तिथेच रोखले होते. त्यामुळे नाईलाज झालेल्या चीनच्या लष्कराला इथून माघार घ्यावी लागली होती. तर गलवानमधील संघर्षात भारतीय सैनिकांनी चीनला सणसणीत प्रत्युत्तर देऊन चिनी लष्कराच्या मर्यादा सार्‍या जगाला दाखवून दिल्या.यामुळे चीनच्या लष्करी सामर्थ्याचा फुगा फुटल्याचे दावे भारताच्या माजी लष्करी अधिकार्‍यांनी केले होते. गेल्या कित्येक दशकांपासून चीन एकही युद्ध लढलेला नाही. अशा चिनी लष्कराच्या सामर्थ्याबाबतचे अवस्ताव दावे जगभरात पेश केले जात होते. पण गलवानमधील संघर्षात चीनचे जवान भारतीय सैनिकांसमोर हतबल ठरले होते, याची दखल सार्‍या जगाने घेतली. या संघर्षानंतर सार्‍या जगात भारताचा दबदबा वाढला होता. चीनला टक्कर देण्याचे सामर्थ्य व धमक भारताकडे आहे, याची जाणीव सार्‍या जगाला यामुळे झाली होती. मात्र आता त्याचा उघडपणे उल्लेख करून भारताचे उपलष्करप्रमुख चीनवरील दडपण अधिकच वाढवित असल्याचे दिसत आहे.

उपलष्कप्रमुख लेफ्टनंट जनरल मोहान्ती यांनी तिबेटवरील चीनच्या अवैध ताब्याचाही आपल्या भाषणात उल्लेख केला. तिबेटकडे सामर्थ्यशाली लष्कर असते, तर चीन कधीही या देशाचा ताबा घेऊ शकला नसता, असे उपलष्करप्रमुखांनी म्हटले आहे. तसेच भारताने आपल्या संरक्षणासाठी आवश्यक ती गुंतवणूक केली नसती, तर जम्मू व काश्मीरमधील दहशतवादाची समस्या आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये नक्षलवादाची समस्या अधिकच गंभीर बनली असती, याकडेही उपलष्करप्रमुखांनी लक्ष वेधले आहे.

leave a reply