आर्थिक मंदीचे भाकित वर्तवून ‘बँक ऑफ इंग्लंड’कडून व्याजदरात अर्ध्या टक्क्यांची वाढ

Bank-of-Englandलंडन – ब्रिटनची अर्थव्यवस्था या वर्षाच्या अखेरीस मंदीत ढकलली जाईल, असे भाकित मध्यवर्ती बँक असणाऱ्या ‘बँक ऑफ इंग्लंड’ने वर्तविले आहे. युद्धाची आर्थिक किंमत मोजावी लागते, असे सांगून ‘बँक ऑफ इंग्लंड’ चे गव्हर्नर अँड्य्रू बेली यांनी पुढील काही महिन्यात ब्रिटनमध्ये विक्रमी महागाई कडाडलेली असेल, असा इशाराही दिला. महागाईचा भडका कमी करण्यासाठी ‘बँक ऑफ इंग्लंड’ने व्याजदरात 0.5 टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. 1995 सालानंतर ब्रिटनच्या मध्यवर्ती बँकेने अर्ध्या टक्क्यांची वाढ करण्याची ही पहिलीच वेळ ठरते.

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला शस्त्रपुरवठा व आर्थिक सहाय्य करण्याबरोबरच रशियावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले होते. या देशांमध्ये अमेरिका व ब्रिटन आघाडीवर आहेत. या निर्बंधांमुळे युरोपच्या इंधनपुरवठ्यात घट झाली असून इंधनाच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात एकट्या ब्रिटनमध्ये इंधनाच्या किंमती तब्बल 60 टक्क्यांची भर पडली आहे. इंधनाचे दर वाढण्याबरोबरच अन्नधान्याच्या पुरवठ्यावरही परिणाम झाल्याने त्याचेही दर वेगाने वाढत आहेत. यामुळे ब्रिटनसह पाश्चिमात्य देशांमध्ये महागाईचा तीव्र भडका उडाला आहे. ब्रिटनमध्ये जून महिन्यातील महागाई निर्देशांक 9.4 टक्क्यांवर गेला होता. महागाई कमी करण्यासाठी सरकारसह मध्यवर्ती बँकेकडून पावले उचलण्यात येत असली तरी त्याचा फारसा परिणाम दिसून आलेला नाही. उलट ‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस’ तयार झाला असून मंदीचेही संकेत मिळत आहेत.

economic-slowdown‘बँक ऑफ इंग्लंड’ने गुरुवारी याला दुजोरा दिला. ब्रिटनची अर्थव्यवस्था या वर्षाच्या अखेरीस मंदीत ढकलली जाण्याची शक्यता असून 2023 सालातही विकासदरातील घसरण कायम राहिल, असे भाकित मध्यवर्ती बँकेने वर्तविले आहे. ‘ब्रिटनमध्ये या वर्षाच्या अखेरच्या तिमाहित महागाईचा दर 13 टक्क्यांपर्यंत भडकू शकतो. 2023 सालातही महागाईची तीव्रता कायम राहिल. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या इंधनाच्या किमती याचे प्रमुख कारण ठरते. इंधनाच्या दरातील वाढीमुळे ब्रिटीश अर्थव्यवस्थेला मंदीचा मुकाबला करावा लागेल. सलग पाच तिमाहित मंदीची स्थिती कायम असेल’, असे भाकित ‘बँक ऑफ इंग्लंड’ने वर्तविले आहे.

मंदीचे भाकित करीत असतानाच मध्यवर्ती बँकेने व्याजदरात अर्ध्या टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे ब्रिटनमधील व्याजदर 1.75 टक्के झाला आहे. या वाढलेल्या व्याजदरामुळे गाड्या, घरे यासह अनेक उत्पादनांच्या किंमतींमध्ये पुन्हा वाढ होण्याची भीती विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. याचा मोठा फटका ब्रिटनमधील सामान्य जनतेला बसणार असून त्याचे पडसाद राजकीय पातळीवरही उमटू शकतात, असा दावा करण्यात येतो.

leave a reply