बेलारुसकडून सुरू असलेली निर्वासितांची घुसखोरी म्हणजे ‘स्टेट टेररिझम’

- पोलंडच्या पंतप्रधानांचा आरोप

निर्वासितांची घुसखोरीवॉर्सा/मिन्स्क/ब्रुसेल्स – बेलारुसच्या सीमेवरून पोलंडमध्ये सुरू असलेली निर्वासितांची घुसखोरी म्हणजे एका देशाच्या समर्थनावर चाललेल्या दहशतवादाचा प्रकार आहे, असा घणाघाती आरोप पोलंडचे पंतप्रधान मॅटेस्झ मोराविकी यांनी केला. बेलारुसमधून गेल्या महिन्यात तब्बल १५ हजार निर्वासित पोलंडमध्ये घुसले असून हजारो निर्वासित पोलंड-बेलारुस सीमेवर दाखल झाले आहेत. युरोपिय महासंघानेही या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली असून बेलारुसवर नवे निर्बंध टाकण्याची घोषणा केली. त्याचवेळी रशिया बेलारुसच्या समर्थनार्थ उतरला असून गुरुवारी रशियाने आपले दोन बॉम्बर्स विमाने बेलारुसमध्ये धाडली आहेत. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पोलंड व नाटोत बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

निर्वासितांची घुसखोरीगेल्या काही महिन्यात बेलारुसमधून युरोपिय देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्वासितांचे लोंढे घुसविण्यात येत आहेत. यामागे बेलारुस व युरोपिय महासंघात असलेला तणाव कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. गेल्या वर्षी बेलारुसमध्ये सर्वेसर्वा राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्याविरोधात आंदोलन सुरू झाले होते. या आंदोलनाला अमेरिकेसह युरोपिय महासंघाने समर्थन दिले आहे. लुकाशेन्को यांना विरोध करणार्‍या नेत्यांना काही युरोपिय देशांनी आश्रयही दिला असून बेलारुसवर दडपण टाकण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. त्यामुळे भडकलेल्या लुकाशेन्को यांनी रशियाच्या सहाय्याने निर्वासितांना युरोपात घुसविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पोलंडमध्ये जवळपास आठ हजारांहून अधिक निर्वासितांनी घुसण्याचा प्रयत्न केला होता. ऑक्टोबर महिन्यात यात जवळपास दुपटीने वाढ झाली असून १५ हजारांहून अधिक निर्वासितांना घुसविण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलंडने म्हटले आहे. बेलारुसच्या सुरक्षायंत्रणा निर्वासितांना घुसखोरीसाठी सर्व प्रकारचे सहाय्य पुरवित असल्याचे समोर येत आहे. ही घुसखोरी रोखण्यासाठी पोलंडने यापूर्वीच सीमाभागात कुंपण उभारण्यास सुरुवात केली असून पॉडलास्की व लुबेल्स्की या प्रांतांमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. त्यापाठोपाठ सीमेवर १५ हजारांहून अधिक जवानही तैनात करण्यात आले आहेत.

निर्वासितांची घुसखोरीमात्र या उपाययोजनांनंतरही बेलारुसकडून घुसखोरीच्या कारवाया सुरूच आहेत. या कारवायांना रशियाची साथ असल्याने बेलारुस अधिकच आक्रमक झाल्याचे सांगण्यात येते. या आक्रमकतेमुळे बेलारुस-पोलंड सीमेवरील तणाव अधिकच चिघळत चालला आहे. दोन्ही बाजूंकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असून पोलंडच्या पंतप्रधानांनी केलेला आरोप त्याचाच भाग आहे. पंतप्रधान मोराविकी यांनी बेलारुसवर दहशतवादाचा आरोप लावण्यापूर्वी युरोपिय महासंघाने लुकाशेन्को यांच्या कारवायांची तुलना गँगस्टरच्या शैलीशी केली होती.

रशियाने बेलारुसला पूर्ण समर्थन देण्याचे संकेत दिले असून महासंघाने निर्वासितांच्या बदल्यात बेलारुसला अर्थसहाय्य पुरवावे, अशी सूचना रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी केली आहे. बेलारुस सीमेवर निर्माण झालेल्या तणावासाठी पोलंडची आक्रमक धोरणे जबाबदार असल्याचा आरोपही रशियाकडून करण्यात आला आहे. बेलारुसच्या समर्थनार्थ रशियाने गुरुवारी दोन ‘टीयु-१६० बॉम्बर्स’ धाडल्याचे समोर आले आहे. रशियाकडून मिळणार्‍या या पाठिंब्यामुळे बेलारुसचे नेते लुकाशेन्को अधिकच आक्रमक झाले असून युरोपला करण्यात येणारा इंधनपुरवठा रोखू शकतो, असे धमकावले आहे.

leave a reply