ब्रिटनमधील इस्रायलच्या राजदूत निदर्शकांच्या हल्ल्यातून बचावल्या

इस्रायलच्या राजदूतलंडन – ब्रिटनमधील इस्रायलच्या राजदूत त्झिपी होटोवेली या पॅलेस्टाईन समर्थक निदर्शकांच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावल्या. ब्रिटनच्या सरकारने झालेला प्रकार निंदनीय असल्याचे सांगून यासाठी दिलगिरी व्यक्त केली. तर लंडनमधील घटनेमुळे घाबरुन आपण मागे हटणार नसल्याचे राजदूत होटोवेली यांनी जाहीर केले.

‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ मध्ये आयोजित कार्यक्रमासाठी राजदूत त्झिपी होटोवेली यांना आमंत्रित केले होते. तर इस्रायली राजदूतांच्या या उपस्थितीला पॅलेस्टाईन समर्थक गट तसेच कट्टरपंथियांनी कडाडून विरोध केला होता. काही कट्टरपंथियांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून विद्यार्थी तसेच पॅलेस्टाईन समर्थकांनी कार्यक्रम सुरू असलेल्या इमारतीत घुसून गदारोळ माजविण्याची धमकी दिली. त्याचबरोबर इस्रायली राजदूतांच्या मोटारीवर हल्ला करण्याची प्रक्षोभक पोस्ट प्रसिद्ध केली होती.

राजदूत होटोवेली कार्यक्रमानंतर इमारतीतून बाहेर पडत असताना, काही आक्रमक निदर्शकांनी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. पण इस्रायली राजदूतांच्या अंगरक्षकांनी वेळीच त्यांच्याभोवती सुरक्षा कडे करून होटोवेली यांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर काही निदर्शकांनी इस्रायली राजदूतांच्या मोटारीच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण लंडन पोलिसांनी निदर्शकांचा डाव हाणून पाडला. कट्टरपंथियांनी इस्रायली राजदूतांवरील हल्ल्याचे समर्थन केले. तर ब्रिटिश पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या सरकारमधील नेते नदिम झहावी आणि जेम्स क्लेव्हर्ली यांनी या हल्ल्याचा निषेध केला तसेच सदर घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

गेल्या वर्षी इस्रायलचे तत्कालिन पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी त्झिपी होटोवेली यांना ब्रिटनच्या राजदूत म्हणून नियुक्त केले. होटोवेली या कडव्या इस्रायल समर्थक म्हणून ओळखल्या जातात. इस्रायल वेस्ट बँकमध्ये उभारत असलेल्या वस्त्यांचे होटोवेली यांनी याआधी समर्थन केले होते.

leave a reply