अमेरिका-रशिया एकत्र येण्यासाठी ही ‘सर्वोत्तम’ वेळ

-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन/मॉस्को – कोरोनाव्हायरसच्या साथीच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात फोनवरून चर्चा पार पडली. ही सर्वसाधारण चर्चा नसून याला फार मोठे राजकीय व धोरणात्मक महत्त्व असल्याचे दोन्ही देशांच्या प्रतिक्रियांवरून स्पष्ट होत आहे. रशियाबरोबर सहकार्य वाढवण्याची ही सर्वोत्तम वेळ असल्याचे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे. तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिका आणि रशिया समान शत्रुच्या विरोधात एकत्र आले होते, असे लक्षवेधी उद्गार रशियाने काढले आहेत. कोरोनाची साथ चीनमुळेच फैलावत असल्याचा आरोप करून अमेरिकेने चीनला धडा शिकवण्याची तयारी केलेली असताना रशियाच्या क्रेमलिनने दुसऱ्या महायुद्धातील अमेरिका व रशियाच्या दिलेल्या आघाडीचा हा संदर्भ सूचक ठरतो.

दुसऱ्या महायुद्धात जर्मन नाझी सैनिकांनी मित्रदेशांसमोर शरणागती पत्करली होती. या विजयाची आठवण म्हणून रशियामध्ये ‘व्हिक्टरी डे’ साजरा केला जातो. याचे औचित्य साधून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी गुरुवारी अमेरिका, फ्रान्स व इतर देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी फोनवरुन चर्चा केली. या चर्चेचे सारे तपशील उघड होऊ शकलेले नाहीत. पण द्विपक्षीय सहकार्य, कोरोनाव्हायरस, क्षेपणास्त्र सहकार्य करार यावर रशियन राष्ट्राध्यक्षांबरोबर चर्चा पार पडल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. ‘अमेरिका आणि रशिया दोन्ही सामर्थ्यशाली देश असून या दोन्ही देशांमध्ये सहकार्य प्रस्थापित होणे आवश्यक आहे. पण २०१६ सालच्या अमेरिकेतील निवडणुकीत रशियाचा हस्तक्षेप असल्याचे खोटे आरोप झाल्यामुळे अमेरिका आणि रशियामधील संबंधांचे मोठे नुकसान झाले. पण आता सत्य समोर येत असून अमेरिका आणि रशियाने एकत्र येण्याची ही सर्वोत्तम वेळ ठरते’, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

कोरोनाव्हायरसच्या साथीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनच्या विरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. या साथीचा उगम चीनमधूनच झाल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला आहे. सुरुवातीच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावरुन चीनवर टीका होत असताना, रशियाने चीनला साथ दिली होती. पण अलिकडच्या काळात रशियाने चीनची बाजू घेतलेली नाही. कोरोनाव्हायरसच्या साथीत रशियाची मोठी हानी होऊ लागल्यानंतर रशियाच्या भूमिकेत बदल झाल्याचे संकेत मिळत आहेत. रशियाने उघडपणे या साथीसाठी चीनवर ठपका ठेवलेला नाही. मात्र, रशियन सरकारशी संलग्न असलेल्या संशोधकांनी कोरोनाव्हायरसचा उगम चीनच्या वुहान प्रयोगशाळेतून झाल्याचा दावा केला आहे.

अशावेळी अमेरिका आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये झालेली चर्चा महत्त्वाची ठरते. या चर्चेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही सामर्थ्यशाली देशांनी एकत्र येण्यासाठी हीच ती सर्वोत्तम वेळ असल्याची केलेली घोषणा वेगळेच संकेत देणारी आहे. तर रशियाच्या क्रेमलिनने देखील दुसऱ्या महायुद्धाच्या काळात समान शत्रूच्या विरोधात अमेरिका आणि रशियाने केलेल्या कारवाईचा दिलेला दाखला सूचक ठरतो. रशिया आणि अमेरिका एकत्र आल्यास, सामरिक स्थैर्य निर्माण होईल. तसेच दहशतवादविरोधी कारवाई, क्षेत्रीय संघर्ष आणि महामारीच्या संकटाला उत्तर देता येईल, असा दावा क्रेमलिनने केला आहे.

दरम्यान, अमेरिका, ब्रिटन, जपान व ऑस्ट्रेलिया या देशांनी कोरोनाव्हायरसच्या साथीची चौकशी करण्याची मागणी करून चीनला धारेवर धरले आहे. हे देश चीनकडून जबर नुकसानभरपाई वसूल करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत, रशियाच्या भूमिकेला फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. रशियाने या चीनविरोधी आघाडीत सहभागी न होता तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला तरी, चीनला याचा फटका बसू शकतो. अशा परिस्थितीत, अमेरिकेबरोबर सहकार्याचे संकेत देऊन रशियन नेतृत्वाने चीनला अस्वस्थ केल्याचे दिसते आहे.

leave a reply