दहशतवाद्यांची अभयारण्ये नष्ट झाल्यानंतरच अफगाणिस्तानात शांतता येईल – अजित डोवल

नवी दिल्ली – दहशतवाद्यांचे सुरक्षित स्वर्ग आणि त्यांची अभयारण्ये नष्ट झाल्याखेरीज अफगाणिस्तानात शांतता नांदणे शक्य नाही,असे भारताच्या राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी बजावले आहे.अफगाणिस्तानसाठी अमेरिकेने नियुक्त केलेले विशेषदूत झल्मे खलिलझाद यांच्याबरोबरील चर्चेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी थेट नामोल्लेख न करता पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद हेच अफगाणिस्तानातील हिंसाचाराचे प्रमुख कारण असल्याचे लक्षात आणून दिले. विशेषदूत झल्मे खलिलझाद अफगाणिस्तान शांती प्रक्रियेवर चर्चा करण्यासाठी भारताच्या भेटीवर आले होते. त्यांनी परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांची भेट घेतली.

फेब्रुवारी महिन्यात अमेरिका व तालिबानमध्ये अफगाणिस्तान शांतीकरार पार पडला. मात्र या करारानंतर ही अफगाणिस्तानातील रक्तपात थांबलेला नाही. तालिबानचे अफगाणिस्तानातील हल्ले सुरू असून हे हल्ले थांबण्याची शक्यता नसल्याचा निर्वाळा खुद्द तालिबानने दिला आहे. त्यामुळे शांतीकरार धोक्यात आला असून अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेण्याची घोषणा करणारी अमेरिकाही यामुळे अडचणीत आली आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानमधील शांती करार वाचविण्यासाठी अमेरिकेचे विशेष दूत झल्मे खलिलझाद धडपडत आहेत. यासाठी खलिलझाद भारत व पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत.

मात्र पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद हेच अफगाणिस्तानातील संघर्षाचे मूळ आहे, याची जाणीव भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी खल्मे खलिलझाद यांना करून दिली. जोवर दहशतवाद्यांचे सुरक्षित स्वर्ग आणि अभयारण्य शाबूत आहेत तोपर्यंत अफगाणिस्तानात शांतता नांदणे शक्यच नाही, असे अजित डोवल यांनी खलिलझाद यांच्याबरोबरील चर्चेत स्पष्ट केले. हे दहशतवाद्यांचे सुरक्षित स्वर्ग व अभयारण्य पाकिस्तानातच आहेत, हे याआधी भारताने वेळोवेळी स्पष्ट केले होते. अफगाणिस्तानच्या सरकारनेदेखील पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे सुरक्षित स्वर्ग हीच आपल्या देशाची मूळ समस्या असल्याचे वारंवार जगजाहीर केले होते.

तालिबानमधील हक्कानी गटाच्या दहशतवाद्यांचा तसेच जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा वापर करून पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना आयएसआयने अफगाणिस्तानात भयंकर हल्ल्याचे सत्र सुरू केल्याचे समोर आले आहे. मार्च महिन्यात अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील शीखधर्मीयांच्या गुरुद्वारावर दहशतवादी हल्ला झाला होता. हा हल्ला पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी घडवल्याचे उघड झाले असून याप्रकरणी अफगाणी यंत्रणांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटकही केली आहे. त्यामुळे भारत पाकिस्तानवर करीत असलेल्या आरोपांना नव्याने दुजोरा मिळाल्याचे दिसते. अफगाणिस्तानची समस्या सोडविण्यासाठी पाकिस्तान सहाय्य करणार नाही तर पाकिस्तान ही अफगाणिस्तानची समस्या आहे , याची जाणीव अजित डोवल यांनी वेगळ्या शब्दात खलिलझाद यांना करून दिली. तर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी अफगाणिस्तानचा विकासासाठी भारत सर्वतोपरी सहाय्य करील अशी ग्वाही यावेळी दिली. तर झल्मे खलिलझाद यांनी अफगाणिस्तानच्या प्रगती व विकासासाठी भारत देत असलेल्या योगदानाची प्रशंसा केली आहे. भारतानंतर झल्मे खलिलझाद पाकिस्तानला भेट देणार आहेत.

leave a reply