वीजटंचाईवर मात करण्यासाठी बायडेन प्रशासनाकडून ‘एनर्जी इमर्जन्सी’ची घोषणा

energy emergencyवॉशिंग्टन – अमेरिकेतील संभाव्य वीजटंचाईवर मात करण्यासाठी बायडेन प्रशासनाने ‘एनर्जी इमर्जन्सी’ची घोषणा केली आहे. त्यानुसार, अमेरिकन जनतेची वीजेची मागणी पूर्ण करण्यासाठी देशाच्या व्यापार, अर्थ व अंतर्गत सुरक्षा विभागाला तातडीची तसेच आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात अमेरिकेतील सौरऊर्जेची निर्मिती वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यास सांगण्यात आले आहे.

रशियाने युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऊर्जा व इंधन बाजारपेठेत मोठी उलथापालथ झाली आहे. त्याचवेळी अमेरिकेत आलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे वीजनिर्मिती व वितरणात अडथळे निर्माण होत आहेत. देशाच्या काही भागात निर्माण झालेली दुष्काळसदृश स्थिती तसेच उष्णतेची लाट यामुळे वीजनिर्मिती घटली असून मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. ‘फेडरल एनर्जी रेग्युलेटरी कमिशन’ व ‘नॉर्थ अमेरिकन इलेक्ट्रिक रिलायबिटी कॉर्पोरेशन’ या आघाडीच्या यंत्रणांनी नजिकच्या काळात वीजेच्या उपलब्धतेबाबत समस्या निर्माण होऊ शकते, असे इशारेही दिले आहेत.

map-energy-emergencyया सर्व बाबींचा उल्लेख करून अमेरिकेतील वीजेची मागणी पूर्ण करण्यासाठी नव्या वीजनिर्मितीची आवश्यकता व्हाईट हाऊसने दिलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आली. नव्या निर्मितीत सौरऊर्जेचा वाटा महत्त्वाचा असून त्यासाठी तातडीने पावले उचलण्यात येतील, असे बायडेन यांनी काढलेल्या अध्यादेशात नमूद करण्यात आले. गेल्या काही महिन्यात सौरऊर्जेसाठी वापरण्यात येणाऱ्या घटकांची टंचाई निर्माण झाल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे.

बायडेन प्रशासनाने यापूर्वी इंधन तसेच ऊर्जानिर्मितीबाबत घेतलेल्या निर्णयांवरून देशांतर्गत पातळीवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. वीजनिर्मितीत कच्चे तेल व कोळशाचा वापर कमी करण्यात आला असून हरित ऊर्जेवर भर देण्यात येत आहे. त्याचा मोठा फटका अमेरिकी उद्योगक्षेत्राला बसत असल्याची तक्रार संबंधित गटांनी केली होती. या पार्श्वभूमीवर बायडेन प्रशासनाने ‘एनर्जी इमर्जन्सी’ची केलेली घोषणा लक्ष वेधून घेणारी ठरते.

leave a reply