भारताकडून अण्वस्त्रवाहू ‘अग्नी-4`ची चाचणी

agni-1नवी दिल्ली – भारताने ‘अग्नी-4` या मध्यम पल्ल्याच्या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्याचे संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. सोमवारी रात्री ही ओडिशातील ‘अब्दुल कलाम आयलँड`वरून ही चाचणी घेण्यात आली, अशी माहिती संरक्षण विभागाच्या निवेदनात देण्यात आली. ही चाचणी नियमित प्रकारातील प्रशिक्षण चाचणी होती, असेही सांगण्यात आले.

संरक्षण विभागाच्या ‘स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड`कडून सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास ‘अग्नी-4` या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. चाचणीदरम्यान ‘अग्नी-4` सर्व निकष यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले. सदर चाचणी भारताच्या ‘क्रेडिबल मिनिमम डिटरन्स कॅपेबिलिटी` धोरणाचे प्रतीक असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले. ‘अग्नी-4`चा पल्ला सुमारे चार हजार किलोमीटर्स इतका आहे.

गेल्या काही वर्षात भारताने ‘अग्नी` क्षेपणास्त्रांच्या विविध आवृत्त्या विकसित केल्या असून त्याच्या यशस्वी चाचण्या पार पाडल्या आहेत. यातील बहुतांश क्षेपणास्त्रे भारतीय संरक्षणदलात तैनात करण्यात आली आहेत. भारताकडे असलेले आंतरखंडीय क्षेपणास्त्र म्हणून ओळखण्यात येणाऱ्या ‘अग्नी-5`ला संरक्षणदलात सामील करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तर गेल्या वर्षी भारताने ‘अग्नी प्राईम` या एक ते दोन हजार किलोमीटर्सचा पल्ला असलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती.

leave a reply