इराणबरोबरील अणुकरार मार्गी लागत असल्याचे बायडेन प्रशासनाचे संकेत

वॉशिंग्टन/तेहरान – महिन्याभरापूर्वी ब्रिटनमधील अरबी वृत्तसंस्थेने अमेरिका आणि इराणमध्ये अणुकरारावरील वाटाघाटींवर सहमती झाल्याचा गौप्यस्फोट केला होता. व्हिएन्नामध्ये सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये ही सहमती झाली, पण त्याची घोषणा करण्यासाठी दोन्ही देश अनुकूल वातावरणाची प्रतिक्षा करीत असल्याचा दावा या वृत्तसंस्थेने केला होता. हा दावा आता प्रत्यक्षात उतरत असल्याचे दिसू लागले आहे. इराणने पुरेसे गांभीर्य दाखविले तर अणुकरार मार्गी लागेल, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी अणुकरार न झाल्यास इराणविरोधात इतर पर्याय मोकळे असल्याचा दावा करणार्‍या बायडेन प्रशासनाच्या धोरणात झालेला बदल लक्षणीय ठरतो.

अमेरिका व इराणमध्ये दोन वर्षांचा अंतरिम अणुकरार झाला असून बायडेन प्रशासन इराणवरील निर्बंध मागे घेण्यास तयार असल्याचे महिन्याभरापूर्वी ब्रिटनमधील अरबी वृत्तसंस्थेने आपल्या बातमीत म्हटले होते. याच्या मोबदल्यात इराण आपल्या अणुप्रकल्पातील युरेनियमचा साठा रशियाकडे सोपविणार असल्याचे अमेरिका व इराणमध्ये निश्‍चित झाल्याचे या बातमीत म्हटले होते.

गेल्या दोन दिवसांपासून अमेरिका आणि इराणकडून अणुकराराबाबत सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. इराणबरोबरचा अणुकरार अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते. तर अमेरिकेच्याच परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी गुरुवारी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेशी बोलताना, अणुकराराबाबत लक्षणीय प्रगती झाल्याचा दावा केला. इराणने अधिक गांभीर्याने प्रयत्न केले तर येत्या काही दिवसांमध्येही हा अणुकरार पार पडू शकतो, असे या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

इराण देखील तसेच संकेत देत आहे. याआधी कधीही नव्हते, इतका हा अणुकरार शक्य असल्याचे आता दिसू लागले आहे, असे इराणने आण्विक चर्चेसाठी नियुक्त केलेले मध्यस्थ अली बाघेरी म्हणाले. तसेच त्याचबरोबर अमेरिकेने यासाठी वास्तववादी प्रयत्न करून गंभीरपणे निर्णय घ्यावे, असे बाघेरी म्हणाले. अमेरिका व इराणकडून अशा घोषणा दिल्या जात असताना, या अणुकरारातील काही ठळक मुद्दे समोर येत आहेत.

जवळपास २० पानांच्या या अहवालात अमेरिका व मित्रदेशांनी इराणच्या ताब्यातील पाश्‍चिमात्य नागरिकांची सुटका करावी. तसेच इराणने पाच टक्क्यांहून अधिक युरेनियमचे संवर्धन थांबवावे, अशा मागण्या केल्या आहेत. याच्या मोबदल्यात दक्षिण कोरियाच्या बँकेतील इराणची सात अब्ज डॉलर्सची जमा मोकळी करील, असे अमेरिकेने मान्य केले आहे. तसेच इराणच्या इंधन व इतर क्षेत्रांवर टाकलेले निर्बंधही टप्प्याटप्प्याने मागे घेण्यात येतील, यावर चर्चा झाल्याचा दावा आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने केला.

अमेरिका आणि इराणने सदर बातम्यांना दुजोरा दिलेला नाही. पण अमेरिका व इराण अणुकराराच्या जवळ पोहोचत असल्याच्या बातम्यांवर इस्रायली माध्यमांमधून प्रतिक्रिया उमटत आहेत. अमेरिका व इराणमधील कुठल्याही अणुकराराशी आपण बांधिल नसल्याचे इस्रायलने याआधीच स्पष्ट केले आहे. तसेच इराणला अणुबॉम्बच्या निर्मितीपासून रोखण्यासाठी इस्रायल आवश्यक कारवाई करील, असा इशाराही इस्रायलचे पंतप्रधान बेनेट यांनी दिला होता, याची आठवण इस्रायली माध्यमे करुन देत आहेत. तर बायडेन यांच्या सत्ताधारी डेमोक्रॅट पक्षातील वरिष्ठ नेते देखील इराणबरोबरील या अणुकराराशी सहमत नसल्याचे माध्यमे लक्षात आणून देत आहेत. सौदी अरेबिया, युएई व इतर अरब देश देखील या अणुकरारावर तीव्र प्रतिक्रिया देऊ शकतात. त्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी बायडेन प्रशासनाने आधीच हालचाली सुरू केल्या होत्या. पण या प्रयत्नांना यश मिळण्याची फारशी शक्यता नाही.

leave a reply