प्रेसिडंट फ्लिट रिव्ह्यूपूर्वी आयएनएस विशाखापट्टणम्वरून ‘ब्रह्मोस’ची चाचणी

विशाखापट्टणम् – शुक्रवारी आयएनएस विशाखापट्टणम् या युद्धनौकेवरून ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. २१ तारखेपासून ‘प्रेसिडंट फ्लिट रिव्ह्यू’ होणार असून त्यानंतर तीनच दिवसात मिलान-२०२२ हा बहुराष्ट्रीय नौदल युद्धसराव सुरू होणार आहे. या दोन्हींची तयारी सध्या पूर्व किनारपट्टीवर सुरू आहे. याआधी आयएनएस विशाखापट्टणम् या विनाशिकेवरून ‘ब्रह्मोस’ची चाचणी घेऊन भारतीय नौदलाने आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडविले आहे.

भारताच्या स्वातंत्र्याचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. याच वर्षात ‘प्रेसिडंट फ्लिट रिव्ह्यू’ही पार पडत आहे. प्रत्येक राष्ट्रपतींच्या कार्यकाळात एकदा अशाप्रकारचा फ्लिट रिव्ह्यू पार पडत असतो. आतापर्यंत असे ११ फ्लिट रिव्ह्यू झाले असून यामध्ये २००१ आणि २०१६ सालात इंटरनॅशनल फ्लिट रिव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इतर देशांच्या युद्धनौका व शिष्टमंडळ सहभागी झाले होते.

यावर्षी १२ वा फ्लिट रिव्ह्यू पार पडत असून स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षानिमित्त तो अधिक भव्य होणार आहे. यामध्ये नौदल आणि तटरक्षकदलाच्या ६० युद्धनौका व जहाजे, तसेच ५० विमाने सहभागी होतील. २१ फेब्रुवारील हा फ्लिट रिव्हू पार पडणार असून यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यासह नौदलाचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणार आहेत. त्यामुळे या किनारपट्टी क्षेत्रातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

‘प्रेसिडंट फ्लिट रिव्ह्यू’च्या दोन दिवस आधी विशाखापट्टणम्च्या किनार्‍याजवळ आयएनएस विशाखापट्टणम् या भारतीय नौदलाच्या ताफ्यातील आधुनिक स्टेल्थ विनाशिकेवरून ब्रह्मोस सूपरसॉनिक क्रूझ आवृत्तीची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी ठरली आहे. भारतीय नौदलाकडून या चाचणीची व्हिडीओ क्लिप प्रसिद्ध करण्यात आली आहे. ‘प्रेसिडंट फ्लिट रिव्ह्यू’ आणि मिलान-२०२२ सरावापूर्वी हे चाचणीचे महत्त्व वाढते. भारतीय नौदलाने आपले सामर्थ्य यातून दाखवून दिले आहे.

मिलान-२०२२ युद्धसराव २५ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान असणार आहे. हा सरावसुद्धा विशाखापट्टणम जवळ बंगालच्या उपसागरात पार पडेल. २५ ते २८ दरम्यान या सरावाचा पहिला टप्पा किनारपट्टीजवळ पार पडणार असून दुसरा टप्पा १ ते ४ मार्च दरम्यान खोल समुद्रात होणार आहे. यामध्ये ४५ देश सहभागी होण्याची शक्यता आहे.

leave a reply