चीनमध्ये दुर्मिळ खनिजांचे दर विक्रमी स्तरावर

विक्रमी स्तरावरबीजिंग – तंत्रज्ञान ते संरक्षण क्षेत्रापर्यंत वापरल्या जाणार्‍या रेअर अर्थ मिनरल्स अर्थात दुर्मिळ खनिजांची किंमत चीनमध्ये विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत रेअर अर्थच्या किंमतीत दुप्पटीने वाढ झाल्याचे चीनच्या मुखपत्राने म्हटले आहे. स्थानिक बाजारात पुरवठ्यापेक्षा मागणीने झेप घेतल्यामुळे रेअर अर्थच्या किंमती वधारल्याचा दावा या मुखपत्राने केला. दरम्यान, अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉन रेअर अर्थ आणि लिथिअमचा साठा वाढविणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

‘ग्लोबल टाईम्स’ या चिनी मुखपत्राने प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार, येत्या काही दिवसात रेअर अर्थ मिनरल्सच्या किंमतींमधील वाढ कायम राहणार आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी नव्या वर्षासाठी जाहीर केलेल्या आर्थिक धोरणांमुळे स्थानिक बाजारातील रेअर अर्थ मिनरल्सची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. पण मागणीच्या प्रमाणात पुरवठा न वाढल्याने दुर्मिळ खनिजांची किंमत वाढ असल्याचा दावा चिनी मुखपत्राने विश्‍लेषकांच्या हवाल्याने केला.

मात्र पुढच्या काळात रेअर अर्थ मिनरल्सच्या किंमती स्थिरावल्या नाही, तर मात्र यासाठी गांभीर्याने प्रयत्न करावे लागतील, असे काही विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. वाढत्या किंमतीमुळे उद्योगांच्या विकासावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जाते.

रेअर अर्थ मिनरल्सचे उत्पादन काही मोजक्या देशांमध्येच केले जाते. यापैकी चीनमध्ये रेअर अर्थ सर्वाधिक प्रमणात आहे. चीनकडे रेअर अर्थ मिनरल्सचे ३६.७ टक्के इतका साठा असून याच्या जागतिक उत्पादनात ६० टक्क्यांहून अधिक हिस्सा एकट्या चीनचा असल्याचा दावा चिनी मुखपत्राने केला. चीनकडे जवळपास चार कोटी, ४० लाख टन इतका रेअर अर्थ मिनरल्सचा साठा असल्याचे चिनी मुखपत्राचे म्हणणे आहे.

रेअर अर्थ मिनरल्सवर चीनची मक्तेदारी मोडून काढण्याची नितांत आवश्यकता असल्याचे आवाहन अमेरिका, युरोपमधील विश्‍लेषकांनी केले. रेअर अर्थच्या निर्मिती आणि पुरवठ्यावर चीनचे वर्चस्व मोडून काढले नाही तर पाश्‍चिमात्य देशांना त्याचा जबर फटका बसेल, असा इशारा आंतरराष्ट्रीय अभ्यासगट देत आहेत. चीन केवळ आपल्या देशातील दुर्मिळ खनिजांवर नियंत्रण ठेवून नाही, तर याचा साठा असलेल्या लॅटिन अमेरिकन देशांवरही चीन प्रभाव टाकून आहे. ही बाब अमेरिकेतील तसेच युरोपिय अभ्यासगट लक्षात आणून देत आहेत. काही महिन्यांपूर्वी चीनने व्हेनेझुएलाच्या खनिजक्षेत्रात ८० कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली होती. व्हेनेझुएलामध्ये सोने, हिरे तसेच युरेनियम, लोखंड, कोळसा आणि कोल्टन या खनिजांचा मोठा साठा आहे. यापैकी कोल्टनचा वापर मोबाईल, लॅपटॉप तसेच इंटरनेट नेटवर्कींग क्षेत्रात केला जातो. काही महिन्यांपूर्वी चीनने अफगाणिस्तानात सत्तेवर आलेल्या तालिबानच्या राजवटीचा फायदा घेऊन या देशातील रेअर अर्थ मिनरल्सवर ताबा घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या करारासह चीनने रेअर अर्थ मिनरल्सच्या साठ्यावर आपली पकड मजबूत करण्यासाठी हालचाली वाढविल्याचा दावा केला जातो.

या रेअर अर्थ मिनरल्सवरील चीनच्या वर्चस्ववादामुळे अमेरिकेच्या सुरक्षेला धोका संभवत असल्याचा इशारा अमेरिकन सिनेटर मार्क केली यांनी साधारण महिन्याभरापूर्वी दिला होता. चीनकडून दाखल होणार्‍या रेअर अर्थ मिनरल्सचा अमेरिकेच्या संरक्षण क्षेत्रातील उत्पादनांमध्ये होणारा वापर अमेरिकेच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे केली म्हणाले होते. अमेरिकेने चीनकडून आयात केल्या जाणार्‍या रेअर अर्थ मिनरल्सवरील अवलंबित्व कमी केले नाही, तर चीन त्याचा वापर शस्त्रासारखा करील, असे केली यांनी बजावले होते. चीनला तशी संधी मिळू नये, यासाठी पेंटॅगॉन काम करीत असल्याचा दावा केला जातो. चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पेंटॅगॉन रेअर अर्थ मिनरल्स, लिथिअम, कोबाल्ट आणि अन्य खनिजांचा साठा करण्याबाबत पेंटॅगॉन विचार करीत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

leave a reply