अणुकरार टिकवायचा असेल तर बायडेन यांनी इराणला निर्बंधमुक्त करावे

- इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ

रोम/वॉशिंग्टन – पुढच्या महिन्यात अमेरिकेची सत्तासूत्रे हाती घेणाऱ्या ज्यो बायडेन यांनी इराणवरील सर्व निर्बंध मागे घेऊन आपला सच्चेपणा सिद्ध करावा. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणविरोधात पुकारलेले आर्थिक युद्ध थांबवावे. त्यानंतरच इराण अणुकराराच्या मर्यादांचे पालन करील, अशी शर्त इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी ठेवली आहे. दोन दिवसांपूर्वी बायडेन यांनी अमेरिकी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत, अणुकरार टिकविण्यासाठी इराणने आपल्या मागण्या मान्य कराव्या, असे म्हटले होते. त्यावर झरिफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अणुकरार

राष्ट्राध्यक्ष नियुक्त असलेल्या बायडेन यांनी अमेरिकी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत इराणचा अणुकरार, अणुशास्त्रज्ञाची हत्या आणि आखातातील तणाव यावर आपली भूमिका मांडली. अमेरिका अणुकरारात सहभागी व्हावे आणि निर्बंध शिथिल करावे असे वाटत असेल, तर इराणने अणुकरारासंबंधीच्या आपल्या नव्या मागण्या मान्य कराव्या. अणुकार्यक्रमागे लष्करी हेतू नाही, हे सिद्ध करावे, अशी मागणी बायडेन यांनी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत केली. तर कुठल्याही परिस्थितीत इराणला अणुबॉम्बने सज्ज होऊ देणार नसल्याचे बायडेन यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.

इराणसमोर अणुकरारासाठी नव्या अटी ठेवताना बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणबाबतच्या धोरणावर टीका केली होती. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 2018 साली सदर अणुकरारातून माघार घेतल्यानंतर इराणचा अणुकार्यक्रम थांबलेला नसून इराण अधिकच अणुबॉम्ब निर्मितीच्या जवळ पोहोचल्याचा आरोप बायडेन यांनी केला. त्याचबरोबर पुन्हा एकदा युरोपिय देशांना एकत्र घेऊन इराणबरोबरच्या अणुकरारासाठी प्रयत्न करणार असल्याचे बायडेन यांनी म्हटले होते. तर गेल्या आठवड्यात इराणी शास्त्रज्ञ फखरीझादेह यांच्या हत्येमुळे इराणबरोबरच्या चर्चेला धक्का बसणार नाही, अशी अपेक्षा बायडेन यांनी व्यक्त केली.

अणुकरार

इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी इटलीतील एका परिषदेला संबोधित करताना बायडेन यांनी दिलेल्या या प्रस्तावावर आपल्या देशाची भूमिका मांडली. ‘आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या सलग 15 अहवालांच्या माध्यमातून इराणने या अणुकरारातील आपला प्रमाणिकपणा सिद्ध केला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अणुकरारातून माघार घेतल्यानंतरच्या पाच अहवालांचा यात समावेश आहे. आता अमेरिकेने आपला सच्चेपणा सिद्ध करण्याची आवश्‍यकता आहे. यापुढे अमेरिकेने या अणुकराराबाबतचा आपला सच्चेपणा सिद्ध केला तरच इराण अणुकराराच्या मर्यादांचे पालन करील’, असे झरिफ यांनी सदर परिषदेत स्पष्ट केले.

तर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवर लादलेले आर्थिक युद्ध, निर्बंध पूर्णपणे माघार घ्यावे, अशी मागणी झरिफ यांनी केली. या निर्बंधांमुळे इराणचे 250 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले असून औषधे आणि वैद्यकीय साहित्यांची खरेदी देखील अवघड होऊन बसल्याची टीका झरिफ यांनी केली. या व्यतिरिक्त अणुकराराशी बांधिल असल्याचा दावा करणाऱ्या युरोपिय देशांवर झरिफ यांनी ताशेरे ओढले. पाच वर्षांच्या या अणुकरानंतरही युरोपातील कंपन्यांची इराणमध्ये गुंतवणूक झालेली नाही, युरोपिय देश इराणकडून इंधन खरेदी करीत नाहीत किंवा युरोपिय बँकांकडून इराणला पैसाही मिळाला नसल्याची तक्रार झरिफ यांनी केली.

त्याचबरोबर गेल्या वर्षी पाश्‍चिमात्य देशांनी आखाती देशांना 100 अब्ज डॉलर्सहून अधिक किंमतीच्या शस्त्रास्त्रांची विक्री केल्याची नाराजी इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केली. पाश्‍चिमात्य देशांनी आपल्या या कुरापती बंद कराव्या. तसेच सौदी अरेबिया व युएई या देशांनी इस्रायलसाठी इराणविरोधात युद्ध लढू नये, असा इशाराही झरिफ यांनी दिला.

दरम्यान, बायडेन सत्तेवर येईपर्यंत इराणवर अधिकाधिक कठोर निर्बंध लादले जातील, असा इशारा ट्रम्प प्रशासनाने आधीच दिला आहे. तर बायडेन सत्तेवर येईपर्यंत इराणने कुठलीही आगळीक करू नये, असे आवाहन अमेरिकेतील बायडेन यांच्या समर्थकांकडून केले जात आहे.

leave a reply