इराणचे दहशतवादी अरब देशांमधील इस्रायली नागरिकांना लक्ष्य करतील

- इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा कौंसिलचा इशारा

तेल अविव – अणुशास्त्रज्ञाच्या हत्येमुळे संतापलेला इराण व इराणसंलग्न दहशतवादी परदेशातील इस्रायली नागरिकांना लक्ष्य करू शकतात. संयुक्त अरब अमिरात (युएई), बाहरिन, इराकचे कुर्दिस्तान तसेच तुर्की, अझरबैजान, जॉर्जिया व इतर देशांमधील इस्रायली नागरिकांना इराणच्या या दहशतवादी हल्ल्यांपासून धोका आहे, असा इशारा इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा कौंसिलने दिला. याआधीच इस्रायलने जगभरातील आपल्या दूतावासांसाठी अलर्ट जारी केला होता.

इस्रायली नागरिकांना

अणुशास्त्रज्ञ फखरीझादेह यांच्या हत्येनंतर गेल्या आठवड्याभरात इराणचे नेते, लष्करी अधिकारी तसेच इराणसंलग्न गटांनी इस्रायलला धमकावले आहे.

अणुशास्त्रज्ञाच्या हत्येसाठी इस्रायलच जबाबदार असल्याचा ठपका ठेवून इस्रायलवर हल्ले चढविण्याचा इशारा इराण व इराणच्या गटांनी दिले आहेत. याचा हवाला देऊन इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा कौंसिलने गुरुवारी जगभरातील आपल्या नागरिकांसाठी अलर्ट जारी केला.

यामध्ये इराणच्या शेजारी असलेले जॉर्जिया, अझरबैजान व तुर्की त्याचबरोबर काही आठवड्यांपूर्वीच इस्रायलशी सहकार्य प्रस्थापित केलेले युएई व बाहरिन या दोन अरब देशांचा उल्लेख केला आहे. या तसेच आफ्रिकी देशांमध्ये स्थायिक असलेल्या किंवा पर्यटनासाठी गेलेल्या इस्रायली नागरिकांच्या जीवाला धोका असल्याचे इस्रायली सुरक्षा कौंसिलने म्हटले आहे. त्यामुळे इस्रायली नागरिकांनी सावध तसेच गर्दीच्या ठिकाणापासून दूर रहावे, असे आवाहन इस्रायलच्या सुरक्षा कौंसिलने केले.

ख्रिस्मसच्या सुट्टीच्या निमित्ताने किमान 25 हजार इस्रायली नागरिक येत्या काही दिवसांमध्ये युएईसाठी रवाना होणार असल्याचा दावा इस्रायलची विमानतळ प्राधिकरणाने केला आहे. यामध्ये इस्रायली सेलिब्रिटी, व्यावसायिक तसेच पर्यटकांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त युरोपिय देशांमधील ज्यूवंशियांची सांस्कृतिक केंद्रे, प्रार्थनास्थळे आणि खाद्यगृहांवरही हल्ले चढविले जाऊ शकतात, असा इशारा इस्रायली यंत्रणांनी दिलाआहे.

leave a reply