अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीनंतरही अमेरिका लष्करी तळांचा ताबा सोडणार नाही

- अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले

वॉशिंग्टन/काबुल – अफगाणिस्तानच्या पाकतिया प्रांतात दहशतवाद्यांनी घडविलेल्या आत्मघाती हल्ल्यात अफगाणी गुप्तचर यंत्रणेच्या तीन अधिकाऱ्यांचा बळी गेला आहे. कतारमध्ये अफगाण सरकार आणि तालिबान यांच्यात सुरू असलेल्या चर्चेला यश मिळत असल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अफगाणिस्तानात हा स्फोट झाला. दरम्यान, अमेरिका अफगाणिस्तानातून सैन्यमाघार घेत असली तरी येथील दोन मोठे लष्करी तळ सोडणार नसल्याची घोषणा अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनी केली.

लष्करी तळ

अफगाणिस्तानात अमेरिकेचे किमान 4500 सैनिक तैनात असल्याचा दावा केला जातो. यापैकी 2500 सैनिक मायदेशी बोलाविण्याची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली आहे. ही सैन्यमाघार 15 जानेवारी 2021 पर्यंत पूर्ण होईल, असे अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनी स्पष्ट केले. पण ही सैन्यमाघार घेतल्यानंतरही अफगाणिस्तानातील दोन मोठे तळ अमेरिकी लष्कराच्या ताब्यातच असतील, असे अमेरिकेच्या संरक्षणदलप्रमुखांनी जाहीर केले. या दोन लष्करी तळांबरोबर अफगाणिस्तानातील काही ‘सॅटेलाईट बेस’ अर्थात लढाऊ विमानांनी सज्ज असलेले लष्करी प्रशिक्षण तळ देखील अमेरिकी लष्कराच्या नियंत्रणात असतील, अशी माहिती संरक्षणदलप्रमुखांनी दिली.

15 जानेवारीनंतर अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैन्य तैनातीत कपात झाली असली तरी यामुळे अमेरिकेच्या दोन मुख्य मोहिमांवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे जनरल मिले यांनी सांगितले. अफगाणी जवानांना लष्करी प्रशिक्षण देणे आणि अल कायदा व ‘आयएस’ दहशतवाद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईत अजिबात फरक पडणार नसल्याचे जनरल मिले म्हणाले. संरक्षणदलप्रमुख जनरल मिले यांनी केलेली घोषणा अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीमुळे सुखावलेल्या दहशतवादी गटांसाठी इशारा असल्याचा दावा केला जातो.

लष्करी तळ

अफगाणिस्तानातील कोणते तळ ताब्यात असतील किंवा कुठल्या तळांचा अमेरिका ताबा सोडेल, याचे तपशील जनरल मिले यांनी देण्याचे टाळले. तसेच अफगाणिस्तानातील ही सैन्यमाघार व संबंधित निर्णय अमेरिकेतील सत्ताबदलापर्यंतच कायम असतील, असे संकेत जनरल मिले यांनी दिले. ज्यो बायडेन यांनी अमेरिकेची सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर ते अफगाणिस्ताातील सैन्यमाघारीबाबत कोणता निर्णय घेतील, यावर आपण बोलू शकत नसल्याचे जनरल मिले यांनी म्हटले आहे. त्यामुळे बायडेन यांच्या कारकिर्दीत अमेरिकेच्या अफगाणिस्तान विषयक भूमिकेत बदल अपेक्षित असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, कतार येथे अफगाण सरकार आणि तालिबानमध्ये सुरू असलेल्या चर्चेला यश मिळत असल्याचा दावा दोन्ही गटांनी केला आहे. दोन्ही गटांमधील वाटाघाटीच्या मुद्यांवर लवकरच चर्चा होईल, असे अफगाण सरकार तसेच तालिबानकडून जाहीर करण्यात आले. याआधीही अशा स्वरुपाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतरही अफगाणिस्तानातील हिंसाचारात घट झाली नव्हती.

leave a reply