बायडेन यांचे इराणला खूश करण्याचे प्रयत्न अमेरिकेसाठी घातक ठरतील

- अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ

वॉशिंग्टन/जेरूसलेम – इराणचा अणुकरार पुनर्जिवित करण्यासाठी उत्सुक असलेले अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना विद्यमान परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी स्पष्ट शब्दात खडसावले. ‘यापुढेही बायडेन यांनी इराणला खुश करण्याचा प्रयत्न केला आणि इराणबरोबर नव्याने अणुकरार केला तर ते अमेरिकेच्या सुरक्षेसाठी घातक ठरेल’, असा इशारा परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी दिला. त्याचबरोबर हे २०१५ साल नाही, याची आठवण अमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्षांनी ठेवावी, असे पॉम्पिओ बजावले आहे. दरम्यान, इस्रायलचे शिष्टमंडळ इराणबाबत बायडेन यांच्याशी चर्चा करणार असल्याची घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी केली आहे.

‘युएई-इस्रायल बिझनेस समिट’च्या पार्श्‍वभूमीवर, इस्रायल आणि युएईच्या माध्यमांना मुलाखत देताना अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना इराणवरील दबाव कायम ठेवण्याचे आवाहन केले. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या निर्बंधांमुळे इराणवर दबाव निर्माण झाला तसेच इराण एकटा पडत चालल्याचे पॉम्पिओ म्हणाले.

‘यापुढे जर अमेरिकेने इराणला खूश ठेवणे, इराणच्या अणुकार्यक्रमाकडे दुर्लक्ष करून सवलती पुरविणे सुरू ठेवले, तर इराणची राजवट अधिकाधिक बेजबाबदार होईल. तसे झाले तर या क्षेत्राचीच नाही तर युरोप आणि अमेरिकेची सुरक्षा देखील धोक्यात येईल’, असा इशारा पॉम्पिओ यांनी दिला.

‘हे २०१५ साल नाही आणि आखातातील अस्थैर्यासाठी इराणच जबाबदार आहे, याची अमेरिकेच्या नव्या प्रशासनाला नक्की माहिती असेल, अशी अपेक्षा आहे. अमेरिकेबरोबर सहकार्य हवे असेल तर इराणच्या राजवटीने आपल्या स्वभावात आणि वर्तनात बदल करावे. कारण याशिवाय इराणबरोबर कुठल्याही प्रकारचे संबंध प्रस्थापित करता येणार नाहीत’, असे सांगून परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी बायडेन तसेच इराणच्या राजवटीलाही संदेश दिला.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी देखील इराणच्या मुद्यावर अमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले. यासाठी इस्रायलचे परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा समितीचे अधिकारी, अणुऊर्जा समितीचे प्रमुख आणि गुप्तचर यंत्रणा मोसादचे प्रमुख बायडेन यांची भेट घेणार असल्याची माहिती पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी सौदी अरेबियाने देखील भावी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना सावध केले होते. इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत कोणताही निर्णय घेण्याआधी बायडेन यांनी सौदी व इतर अरब देशांशी चर्चा करावी, असे सौदीने सुचविले होते. ट्रम्प प्रशासनाबरोबर इस्रायल आणि सौदीकडून दिले जाणारे इशारे भावी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यासाठी पुढची वाटचाल सोपी नसेल, याचे संकेत देत आहेत.

leave a reply