उत्तर कोरिया आण्विक सामर्थ्य वाढविणार

- हुकूमशहा किम जाँग-उन यांचा इशारा

सेऊल – अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन पुढच्या आठवड्यात शपथग्रहण करणार आहेत. त्याआधीच उत्तर कोरियाने बायडेन यांना उद्देशून धमकावण्यास सुरुवात केली आहे. ‘अमेरिकेत कुणीही सत्तेवर आले तरी त्यांची उत्तर कोरियाबाबतची भूमिका बदलणार नाही. त्यामुळे उत्तर कोरिया देखील आपल्या आण्विक सामर्थ्यात वाढ करीतच राहिल’, असा इशारा उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांनी दिला. उत्तर कोरियाने आण्विक पाणबुडीच्या निर्मितीच्या दिशेने पावले टाकल्याचे हुकूमशहा उन यांनी जाहीर केले.

गेल्या आठवड्यात उत्तर कोरियाच्या कम्युनिस्ट राजवटीची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. आठ दिवसांच्या या बैठकीची बुधवारी सांगता झाली. या बैठकीच्या निमित्ताने हुकूमशहा किम जाँग उन यांनी देशाचा आर्थिक विकास करण्याची घोषणा केली. त्याचबरोबर उत्तर कोरिया आण्विक सामर्थ्यात वाढ करीत राहणार असल्याचे हुकूमशहा उन म्हणाले.

बायडेन यांचा उघडपणे उल्लेख न करता हुकूमशहा उन यांनी अमेरिकेच्या धोरणांवर ताशेरे ओढले. ‘अमेरिका उत्तर कोरियाचा प्रमुख शत्रूदेश आहे. अमेरिका उत्तर कोरियाबाबतच्या आपल्या धोरणांमध्ये बदल करीत नाही, तोपर्यंत उभय देशांमधील संबंध पुढे सरकणार नाहीत’, असे उन म्हणाले. त्याचबरोबर काही झाले तरी अमेरिकेच्या उत्तर कोरियाविरोधी भूमिकेत बदल होणार नसल्याचा दावा उत्तर कोरियाच्या हुकूमशहांनी केला.

यानंतर हुकूमशहा उन यांनी आपल्या अधिकार्‍यांना लष्करी कार्यक्रम पुढे सुरू ठेवण्याचे आदेश दिले. ‘उत्तर कोरियाने यापुढे आपल्या आण्विक तसेच सर्वात बलशाली लष्करी सामर्थ्यात वाढ सुरू ठेवण्याची गरज आहे’, असे उन यांनी स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात या बैठकीच्या सुरुवातीलाही उत्तर कोरियाच्या हुकूमशहांनी देशाच्या आण्विक तसेच क्षेपणास्त्र क्षमतेत वाढ करण्याची घोषणा केली होती. उत्तर कोरियन जनता आणि देश तसेच साम्यवादी विचारांच्या संरक्षणासाठी ही कारवाई करावीच लागेल, असे हुकूमशहा उन यांनी म्हटले होते. मात्र यावेळी उत्तर कोरियाच्या हुकूमशहांनी थेट अमेरिकेच्या नव्या नेतृत्वावर हल्ला चढविला आहे.

अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही उत्तर कोरियाच्या हुकूमशहा यांनी याआधी सडकून टीका केली होती. तसेच उत्तर कोरियाची क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या पूर्वेकडील शहरांचा वेध घेऊ शकतात, अशी धमकी उन यांनी दिली होती. पण दोन वर्षांपूर्वी व्हिएतनाम येथील बैठकीत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि हुकूमशहा उन यांच्यात ऐतिहासिक चर्चा पार पडली होती. यानंतर उत्तर कोरियाच्या अणुकार्यक्रमाच्या प्रश्‍नावर तोडगा निघू शकतो, असे विधान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केले होते.

leave a reply