कोरोना व गृहबांधणी क्षेत्रातील संकटाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या अर्थव्यवस्थेत मोठी घसरण

चीनच्या अर्थव्यवस्थेत मोठी घसरणबीजिंग – कोरोना साथीचे उद्रेक, गृहबांधणी क्षेत्रातील संकट व उष्णतेची लाट या पार्श्वभूमीवर चीनच्या अर्थव्यवस्थेत मोठी घसरण झाली. एप्रिल ते जून या तिमाहित चीनच्या अर्थव्यवस्थेने जेमतेम 0.4 टक्के विकासदर नोंदविला आहे. हा 2020 सालानंतरचा नीचांक ठरतो. आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी चीनच्या नव्या जीडीपी अहवालावर शंका उपस्थित केल्या आहेत. प्रत्यक्षात चीनची अर्थव्यवस्था मंदावल्याचे दावे तज्ज्ञांकडून करण्यात आले.

चीनच्या अर्थव्यवस्थेत मोठी घसरणगेल्या काही महिन्यात चीनमध्ये सातत्याने कोरोनाचे नवे उद्रेक समोर आले होते. हे उद्रेक रोखण्यासाठी चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने ‘झीरो कोविड पॉलिसी’ची कठोर अंमलबजावणी केली होती. याचा थेट परिणाम जगाची फॅक्टरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीनच्या उत्पादन क्षेत्राला बसला होता. या क्षेत्राबरोबरच त्यावर अवलंबून असलेली जागतिक पुरवठा साखळीही विस्कळीत झाली होती. चीनच्या धोरणावर नाराज झालेल्या बड्या परदेशी कंपन्यांनी आपल्या ‘ऑर्डर्स’ पुढे ढकलण्याचा तसेच स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.

उत्पादन क्षेत्राबरोबरच चीनच्या जीडीपीमध्ये मोठा हिस्सा असणाऱ्या गृहबांधणी व मालमत्ता क्षेत्रातही संकटांची मालिका सुरू आहे. गेल्या वर्षी चीनमधील ‘एव्हरग्रॅन्ड’ ही आघाडीची कंपनी परदेशी कर्जांची परतफेड करण्यात अपयशी ठरल्याचे उघड झाले होते. त्याचे पडसाद चीनच्या इतर कंपन्यांमध्येही उमटून गृहबांधणी व मालमत्ता क्षेत्र अडचणीत आलेे. केवळ बँकाच नाही तर कंपन्यांच्या ग्राहकांमध्येही नाराजी तीव्र झाली असून आक्रमक निदर्शने सुरू झाली आहेत. चीनच्या 80हून अधिक शहरांमधील खरेदीदारांनी कंपन्यांना हफ्ते देण्यास नकार दिला आहे. ही मोहीम अधिक व्यापक होत असून सत्ताधारी राजवटीलाही त्याची दखल घेणे भाग पडले.

चीनच्या अर्थव्यवस्थेत मोठी घसरणसलग 10 महिने चीनमधील घरांची विक्री घसरत असून त्याचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, चीनमध्ये आलेली उष्णतेची लाट तसेच अतिवृष्टी यामुळे आघाडीच्या शहरांमधील व्यवहार ठप्प झाले होते. त्याचेही परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसत असल्याचे नवी आकडेवारी दाखवून देत आहे. चीनमधील ही घसरण कायम राहिल्यास वर्षअखेरीस साडेपाच टक्क्यांचा विकासदर गाठणे चीनला शक्य होणार नाही, असे भाकित विश्लेषकांनी वर्तविले आहे.

दरम्यान, चीनने दाखविलेली 0.4 टक्के वाढ फसवी असल्याचा दावा काही विश्लेषक करीत आहेत. ‘झीरो कोविड पॉलिसी’मुळे ठप्प झालेले व्यवहार व इतर क्षेत्रातील संकटांचा विचार करता चीनची अर्थव्यवस्था मंदीत गेली असावी, असा निष्कर्ष काही विश्लेषकांनी नोंदविला आहे.

leave a reply