कोरोना लसीकरणाच्या आघाडीवर भारताने 200 कोटींचा टप्पा ओलांडला

- जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताची प्रशंसा

200 कोटींचा टप्पानवी दिल्ली – कोरोनाच्या साथीची तीव्रता व भारतील आरोग्यविषयक सुविधा लक्षात घेता सर्वच भारतीयाचे लसीकरण करण्यासाठी या देशाला काही वर्षांचा कालावधी लागेल, असे दावे पाश्चिमात्यांनी केले होते. मात्र अवघ्या 18 महिन्यात भारताने लसीकरणाच्या आघाडीवर 200 कोटींचा टप्पा ओलांडून इतिहास घडविला आहे. ‘भारताने मिळविलेल्या या यशामुळे कोरोनाच्या साथीविरोधातील जागतिक लढाईला अधिकच बळ मिळाले आहे’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्याचवेळी या लसीकरणाच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येकाचा पंतप्रधानांनी अभिनंदन केले. या यशासाठी जागतिक आरोग्य संघटनेने भारताची प्रशंसा केली आहे.

रविवारी कोरोनाच्या लसींचे 200 कोटी डोस देण्याचा विक्रमी टप्पा भारताने ओलांडला. 16 जानेवारी 2021 रोजी देशाच्या कोरोना लसीकरण कार्यक्रमाची सुरूवात झाली होती. कोरोनाचे पहिले 100 कोटी डोस देण्यास नऊ महिन्याचा कालावधी लागला होता. तर 100 कोटींचा दुसरा टप्पा गाठण्यासाठीही जवळपास तितकाच काळ लागला आहे. गेल्या वर्षी देशाने 21 ऑक्टोबर रोजी 100 कोटींचा टप्पा ओलांडला होता.

2020 च्या सुरुवातीला देशात कोरोनाच्या साथीचा शिरकाव झाला होता. विकसित व प्रगत देशांच्या आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या साथीमुळे कोलमडून पडल्या होत्या. तिथे तुलनेने प्रंचड लोकसंख्याअसलेल्या व आरोग्यसुविधा पुरेशा प्रमाणात नसलेल्या भारताचा कोरोनाच्या साथीसमोर निभाव लागणार नाही, असे दावे केले जात होते. कोरोनाच्या भारतातील बळींची संख्या भयावह असेल, अशी चिंताही काहीजणांनी व्यक्त केली. पण भारताने या साथीचा अधिक समर्थपणे मुकाबला करून साऱ्या जगाला चकीत केले.

भारतात जेथे सॅनिटायझर, मास्क, पीपीई किटस्‌‍ व व्हेटिंलेटर्सही आयात करावे लागत होते. पण काही महिन्यातच. भारत या साहित्याचा निर्यातदार बनला. तसेच भारताने कोरोनाची लसीही विक्रमी वेळेत विकसित करून सर्व जगाला थक्क केले. कोरोनाच्या लसी विकसित करण्यात यश आले, तरी भारताच्या 130 कोटी जनतेला लसीचे डोस देण्यासाठी कित्येक वर्षांचा कालावधी लागू शकतो, असे निष्कर्ष पाश्चिमात्य माध्यमे नोंदवत होती. मात्र भारताच्या लसीकरणाच्या मोहिमेचा वेग विकसित देशांनाही मागे टाकणारा ठरला.

भारताने कोविन ॲप, लसीकरण कार्यक्रमासाठी उभारलेली यंत्रणा यांचा प्रभावी वापर करून लसीकरण कार्यक्रम वेगाने पुढे नेला. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व फ्रन्ट लाईन वर्कससाठी लसीकरण सुरू झाले. मार्च 2021 पासून लसीकरणाचा दुसऱ्या टप्पा सुरू झाला. यात 60 वर्षांवरील नागरिकांना लसी मिळू लागल्या. तिसऱ्या टप्प्यात 45 वर्षांवरील, तर 2021च्या मध्यावर सुरू झालेल्या तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्वजणांचे लसीकरण सुरू झाले. दिवसाला 70 लाख ते एक कोटी लसीचे डोस या कार्यक्रमाअंतर्गत देण्यात येत होते. याद्वारे भारताने आपली क्षमता दाखवून दिली.

जागतिक आरोग्य संघटनेने या यशासाठी भारताची प्रशंसा केली आहे. मात्र कोरोनाची लढाई अद्याप संपलेली नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने बजावले आहे.

leave a reply