भारताचा विकासदर ९.५ टक्क्यांवर पोहोचेल

- पतमानांकन संस्था 'फीच'चा अंदाज

नवी दिल्ली – कोरोनाव्हायरसमुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. मात्र या स्थितीतून भारत सावरेल आणि भारतीय अर्थव्यस्था पुढील आर्थिक वर्षात ९.५ टक्के इतक्या दराने प्रगती करेल, असा दावा ‘फीच’ या आंतरराष्ट्रीय पत मानांकन संस्थेने केला आहे. याशिवाय ‘फीच’ने भारतीय अर्थव्यस्थेच्या सध्याच्या मानांकन श्रेणीतही सुधारणा केली आहे. याशिवाय ‘एस अँड पी’ या आणखी एका जगातिक पतमानांकन संस्थेने भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास दाखविला आहे.

FITCHभारतच नव्हे जगभरातील अर्थव्यस्था कोरोनामुळे संकटात सापडल्या आहेत. या धक्क्यातून जगातील बड्या अर्थव्यवस्थाही इतक्यात सावरणार नाहीत असा दावा केला जातो. मात्र ‘फीच’ आणि ‘एस अँड पी’ या जगातील दोन अग्रगण्य पतमानांकन संस्थांनी भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उसळी घेईल, याचे संकेत दिले आहेत. कोरोनाव्हायरसच्या संकटाआधीच भारतीय अर्थव्यस्था मंदावल्याचे दिसून आले होते. याला अनेक कारणे होती. सरकारवरील कर्ज वाढल्याने मोठी आव्हाने निर्माण झाली होती. कोरोनाव्हायरसने या संकटाला अधिक गंभीर बनवले, असे ‘फीच’ने आपल्या अंदाजात म्हटले आहे. यामुळे चालू आर्थिक वर्षात विकासदर ५ टक्क्यांनी घटण्याचा अंदाज ‘फीच’ने वर्तविला आहे.

मात्र भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा वेगाने प्रगती करील. आर्थिक क्षेत्रात पुन्हा कोणते संकट आले नाही, तर पुढील आर्थिक वर्षात भारत ९.५ टक्के इतका विकासदर गाठेल. २५ मार्चला लॉकडाऊन सुरु झाल्यापासून भारतात जवळजवळ सर्व आर्थिक हालचाली थांबल्या होत्या. त्या आता हळूहळू सुरु होत आहेत. मात्र अजूनही पूर्ण निर्बंध मागे घेण्यात आलेले नाहीत. अर्थव्यस्था पुन्हा वेग धरण्यास वेळ लागेल, असे ‘फीच’ने आपल्या अहवालात म्हटले आहे.

अर्थव्यस्थेची गती देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने काही महत्वाची पावले उचलली. व्याजदारात मोठी कपात केली. तसेच पतधोरण अधिक शिथिल केले. याशिवाय सरकारने सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) १० टक्के इतके आर्थिक पॅकेज जाहीर केले. याचा दाखलाही ‘फीच’ने आपल्या अहवालात दिला आहे. भारतीय अर्थव्यस्थेत दिसून येणारी वृद्धी सध्याच्या ‘बीबीबी’ श्रेणीपेक्षा अधिक असेल, असे ‘फीच’ने म्हटले आहे.

‘फीच’पाठोपाठ ‘एस अँड पी’ या आणखी एका जागतिक पतमानांकन संस्थेने भारतीय अर्थव्यस्थेवर विश्वास व्यक्त केला आहे. ‘एस अँड पी’ने भारतीच्या रेटिंगमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. भारताची आर्थिक स्थिरता येईल आणि २०२१ मध्ये यामध्ये सुधार होईल, असा ‘एस अँड पी’चा दावा आहे. ‘एस अँड पी’नेही चालू आर्थिक वर्षात भारताच्या विकासदरात ५ टक्के घटण्याचा अंदाज वर्तविला आहे. मात्र ‘एस अँड पी’ने भारतीय अर्थव्यस्थेला दिलेले ‘बीबीबी’ मानांकन सरासरीपेक्षा चांगला विकासदर दाखवत असल्याचे सांगितले जाते. तसेच भारताने आर्थिक सुधारणा योग्य पद्धतीने लागू केल्या, तर भारताचा विकासदर इतर देशांपेक्षा चांगला राहील, असे ‘एस अँड पी’ने म्हटले आहे.

leave a reply