अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीनंतर ब्लॅकवॉटरचे कंत्राटी जवान तैनात केले जातील

- वृत्तसंकेतस्थळाचा दावा

ब्लॅकवॉटर

इस्लामाबाद – अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीवर ठाम आहेत. पुढच्या काही दिवसात ही सैन्यमाघार सुरू होईल. अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन देखील ही सैन्यमाघार रोखणार नाहीत. मात्र, अमेरिकेची सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर बायडेन अफगाणिस्तानात ‘ब्लॅकवॉटर’ या कंपनीचे कंत्राटी जवान तैनात करतील. असे झाले तर ‘ब्लॅकवॉटर’ची तैनाती अफगाणिस्तानबरोबर पाकिस्तानसाठी देखील धोकादायक ठरेल, अशी चर्चा सुरू झाली आहे.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कतारची राजधानी दोहा येथे अमेरिका आणि अफगाण तालिबानमध्ये शांतीकरार झाला होता. या करारानुसार अमेरिका अफगाणिस्तानातून सैन्यमाघार घेत आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अमेरिकेचे दोन हजार जवान अफगाणिस्तानातून माघार घेतील. यानंतरही अमेरिकेचे अडीच हजार जवान अफगाणिस्तानात तैनात असतील. पण अमेरिकेची अफगाणिस्तानातील ही सैन्यमाघार काही महिन्यांसाठीच असेल, असा दावा एका वृत्तसंकेतस्थळाने केला आहे.

अमेरिका व तालिबानमध्ये झालेला हा सैन्यमाघारीचा करार १४ महिन्यांच्या मुदतीवर करण्यात आला होता. सदर मुदत २०२१ सालच्या एप्रिल महिन्यात पूर्ण होत आहे. त्यामुळे अमेरिकेने जानेवारी महिन्यात आपले जवान माघारी बोलाविण्यास सुरुवात केली असली तरी, भावी राष्ट्राध्यक्ष बायडेन एप्रिल महिन्यानंतर अफगाणिस्तानात पुन्हा सैन्यतैनाती करण्याचा निर्णय नक्कीच घेऊ शकतात, असे या संकेतस्थळाचे म्हणणे आहे.

ब्लॅकवॉटर

अमेरिकी जवानांना अफगाणिस्तानच्या प्रदिर्घ युद्धात पुन्हा ढकलण्यापेक्षा बायडेन अफगाणिस्तानची जबाबदारी ‘ब्लॅकवॉटर’सारख्या कंत्राटी जवान पुरविणार्‍या खाजगी कंपन्यांना देऊ शकतात. ‘ब्लॅकवॉटर’चे (सध्याचे नाव अकॅडमी) प्रमुख एरिक प्रिन्स यांनी देखील दोन वर्षांपूर्वी अफगाणिस्तानातील युद्धात आपले कंत्राटी जवान उतरविण्याचा प्रस्ताव राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना दिला होता. तर गेल्या वर्षी ‘ब्लॅकवॉटर’ या कंपनीने अफगाणिस्तानसाठी ‘वी आर कमिंग’ असा प्रचारही सुरू केला होता, याची आठवण या संकेतस्थळाने करुन दिली.

इराक, अफगाणिस्तानातील युद्धात ‘ब्लॅकवॉटर’ने स्थानिकांवर बेछूट गोळीबार करून त्यांची हत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. या खाजगी कंपनीच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर खटले देखील सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘ब्लॅकवॉटर’च्या १५ दोषींना माफी दिली होती. यामध्ये इराकमधील हत्याकांडात सहभागी असलेल्या चार जवानांचा समावेश होता. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी ब्लॅकवॉटरच्या जवानांबाबत घेतलेल्या या निर्णयाकडे सदर संकेतस्थळाने लक्ष वेधले आहे.

त्यामुळे अमेरिकी लष्कर अफगाणिस्तानातून माघार घेत असले तरी ही तात्पुरती माघार आहे. अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन पुढच्या काही महिन्यात अफगाणिस्तानमध्ये नव्याने तैनातीची घोषणा करू शकतात. अमेरिकी सैनिकांऐवजी अफगाणिस्तानच्या सुरक्षेसाठी जबाबदारी ‘ब्लॅकवॉटर’च्या कंत्राटी जवानांकडे देण्याचा निर्णय जाहीर करू शकतात, असा दावा या संकेतस्थळाने केला. ही ‘ब्लॅकवॉटर’ची तैनाती पाकिस्तानसाठी धोकादायक ठरेल, असा दावा एका संकेतस्थळाने केला आहे. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानात रेमंड डेव्हिस या अमेरिकी दूतावासाच्या अधिकार्‍याने दोन पाकिस्तानी हेरांना ठार केले होते. मात्र अमेरिकेच्या दडपणामुळे पाकिस्तानला त्याची सुटका करणे भाग पडले होते. अफगाणिस्तानात ब्लॅकवॉटरचे जवान आल्यानंतर पाकिस्तानला अशा कारवाया सहन कराव्या लागतील, असा इशारा सदर संकेतस्थळाने दिला आहे.

leave a reply