समविचारी देशांची आघाडी उभारून अमेरिकेने चीनचा मुकाबला करावा

- भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन

समविचारीवॉशिंग्टन/बीजिंग – चीनकडून व्यापार व तंत्रज्ञान क्षेत्रात सुरू असलेल्या कारवाया, मानवाधिकारांचे उल्लंघन व इतर हालचालींचा मुकाबला करायचा असेल तर समविचारी देशांबरोबर आघाडी उघडणे अधिक प्रभावी ठरेल, असा दावा अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केला. यावेळी बायडेन यांनी, चीनला रोखण्यासाठी अमेरिकेने आपल्या संरक्षणक्षमता वाढवायला हव्यात याकडेही लक्ष वेधले. ज्यो बायडेन राष्ट्राध्यक्षपदी आल्यानंतर अमेरिकेच्या चीनविरोधी भूमिकेत बदल होईल, असा दावा काही विश्‍लेषकांकडून केला जात होता. मात्र बायडेन चीनबाबत उदार धोरण स्वीकारणार नाहीत, असे संकेत या वक्तव्यातून मिळत आहेत. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. ट्रम्प यांनी अर्थव्यवस्था, व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान क्षेत्रासह तैवान व तिबेटसारख्या संवेदनशील मुद्यांवरून चीनला सातत्याने लक्ष्य केले आहे. राष्ट्राध्यक्षपदाचा कालावधी संपण्यास मोजके दिवस राहिले असतानाही ट्रम्प व प्रशासनाने चीनविरोधी निर्णयांचा धडाका कायम ठेवला आहे. त्यामुळे चीन सध्या चांगलाच बिथरला असून बायडेन यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर धोरण बदलेल, अशी अपेक्षा चीनमधून व्यक्त होत आहे.

मात्र गेल्या काही आठवड्यांमध्ये बायडेन यांचे निकटवर्तिय तसेच सल्लागारांकडून चीनविरोधातील अमेरिकेचे धोरण कायम राहण्याचे संकेत दिले जात आहेत. बायडेन यांचे नवे वक्तव्य त्याला दुजोरा देणारे आहे. ‘व्यापार, तंत्रज्ञान, मानवाधिकार यासह अनेक क्षेत्रात चीनच्या सत्ताधारी राजवटीकडून कारवाया सुरू आहेत. त्यासाठी चीनला जबाबदार धरुन प्रत्युत्तर द्यायचे असेल तर समविचारी व भागीदार देशांशी आघाडी करणे महत्त्वाचे ठरेल. तसे झाले तर चीनविरोधात आपली बाजू अधिक बळकट व प्रभावी ठरेल’, असा दावा बायडेन यांनी केला. यावेळी बायडेन यांनी ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्राच्या सुरक्षेचाही उल्लेख केला.

अमेरिका व चीनमधील संबंधांचा विचार करताना व्यापार, अर्थव्यवस्था, पर्यावरण यांच्याबरोबरच ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्राची सुरक्षा व संपन्नतेचा मुद्दाही महत्त्वाचा ठरतो, असे बायडेन यांनी सांगितले. समविचारीया मुद्यांवर अमेरिकेचे सहकारी देश जर बरोबरीने उभे असतील तर आपण अधिक सामर्थ्याने चीनला प्रत्युत्तर देऊ शकतो, याची जाणीव त्यांनी करून दिली. यावेळी बायडेन यांनी अमेरिकेच्या संरक्षणक्षमता वाढविण्याची आवश्यकता असल्याचाही दावा केला. अमेरिकेला भविष्यातील धोक्यांचा मुकाबला करायचा असेल तर संरक्षणक्षेत्रातील सुधारणा आवश्यक आहेत, असे भावी राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे माजी वरिष्ठ लष्करी अधिकारी व बायडेन यांचे सल्लागार जनरल स्टॅन्ले मॅक्क्रिस्टल यांनीही, ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रात चीनच्या लष्करी आक्रमकतेला रोखण्यात अमेरिकेने बराच उशिर केल्याचा इशारा दिला होता. चीनलो प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेने आपले संरक्षणसामर्थ्य वाढविण्याबरोबरच त्या क्षेत्रातील सहकारी तसेच भागीदार देशांनाही सहाय्य करून आघाडी मजबूत करायला हवी, असा सल्लाही जनरल मॅक्क्रिस्टल दिला होता.

leave a reply