इस्रायलच्या पाणबुडीला लक्ष्य करण्याची इराणची धमकी

पाणबुडीला लक्ष्य

तेहरान – ‘इस्रायलच्या पाणबुडीने पर्शियन आखातात प्रवेश केला तर ते आक्रमण मानले जाईल आणि इस्रायलच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा, सूड घेण्याचा इराणला पूर्ण अधिकार असेल’, अशी धमकी इराणी संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा व पररराष्ट्र धोरण समितीचे प्रवक्ते अबू अल-फझल अमोई यांनी दिली. पर्शियन आखातातील इराणच्या हालचालींवर इस्रायलच्या पाणबुड्यांची नजर असल्याचे इस्रायलच्या लष्कराने जाहीर केले होते. तर इस्रायलची पाणबुडी पर्शियन आखाताच्या दिशेने प्रवास करीत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली होती. या पार्श्‍वभूमीवर इराणने दिलेल्या या धमकीचे गांभीर्य वाढले आहे.

अमेरिकेची ‘युएसएस जॉर्जिया’ ही आण्विक पाणबुडी गेल्या आठवड्यातच पर्शियन आखातात दाखल झाली आहे. या पाठोपाठ इस्रायलची पाणबुडी देखील पर्शियन आखाताच्या दिशेने रवाना झाल्याची बातमी इस्रायली वृत्तवाहिनीने अरब गुप्तचर यंत्रणेच्या सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केली होती. इस्रायलच्या लष्कराने या बातमीवर प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. पाणबुडीला लक्ष्यपण इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्याने गेल्या आठवड्यात सौदी अरेबियाच्या दैनिकाशी बोलताना आपली पाणबुडी शांतपणे सर्वत्र संचार करीत असल्याचे सांगितले. तसेच आखाती क्षेत्रातील इराणच्या हालचालींवर आपल्या पाणबुडीची करडी नजर असल्याचा इशारा इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्याने दिला होता.

पर्शियन आखाताच्या दिशेने प्रवास करणार्‍या इस्रायली पाणबुडीच्या या बातम्यांवर इराणमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने पर्शियन आखात हे इराणसाठी ‘रेड लाईन्स’ अर्थात मर्यादारेषा असल्याचा इशारा दिला. ‘इराणसाठी पर्शियन आखात काय आहे, ते प्रत्येकाला ठाऊक आहे. या सागरी क्षेत्राच्या सुरक्षेबाबत इराणची असलेली धोरणेही प्रत्येकाला ठाऊक आहे. इराणची ही धोरणे, ‘रेड लाईन्स’ ओलांडल्या तर किती मोठा धोका संभवतो, याचीही प्रत्येकाला जाण आहे. तेव्हा इस्रायलने या रेड लाईन्स ओलांडण्याची चूक करू नये’, असा इशारा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खातिबझादेह यांनी दिला.पाणबुडीला लक्ष्य

त्याचबरोबर आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यात असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणविरोधात कुठलेही धाडस करण्याची चूक करू नये, असे खातिबझादेह यांनी बजावले. इराणच्या संसदेच्या ‘राष्ट्रीय सुरक्षा व परराष्ट्र धोरण समिती’चे प्रवक्ते अबू अल-फझल अमोई यांनी इस्रायलच्या पाणबुडीवर हल्ला चढविण्याची धमकी दिली. ‘इराणच्या विरोधातील कुठल्याही आक्रमणला जोरदार आणि मोठे उत्तर मिळेल, हे इस्रायलने लक्षात ठेवावे’, असे अमोई यांनी अरबी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.

दरम्यान, इस्रायल तसेच अमेरिकेला धमकावणार्‍या इराणने दोन दिवसांपूर्वीच होर्मुझच्या आखातातील आपल्या बेटांवर विमानभेदी यंत्रणा तैनात केल्याचे जाहीर केले होते. तर इराणने इराकच्या सीमेजवळ लघु पल्ल्याची क्षेपणास्त्रे तैनात केल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत.

leave a reply