रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी लंडनवर क्षेपणास्त्राच्या माऱ्याची धमकी दिली होती

- ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा आरोप

लंडनवर क्षेपणास्त्रेलंडन – रशियाचे राष्ट्राद्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आपल्याला लंडनवर क्षेपणास्त्रे डागण्याची धमकी दिली होती, असे ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री रॉबर्ट गेट्स यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना रशियाला महान साम्राज्य म्हणून उभे करण्याची जबाबदारी आपल्याला मिळालेली असल्याचे वाटत असल्याचा दावा केला. त्यामुळे रशिया व युक्रेनच्या युद्धाबरोबर सुरू असलेल्या प्रचारयुद्धाचीही तीव्रताही वाढू लागल्याचे दिसत आहे.

युक्रेनचे युद्ध सुरू होण्याच्या आधी, गेल्या वर्षाच्या २ फेब्रुवारी रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन व त्यावेळचे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या फोनवरून चर्चा झाली होती. यावेळी युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याविरोधात बोरिस जॉन्सन यांनी रशियन राष्ट्राध्यक्षांना सज्जड इशारा दिला होता. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यानंतर नाटोचे लष्कर रशियाच्या सीमेपर्यंत येऊन धडकेल, असे आपण स्वतः रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना बजावले होते, अशी माहिती बोरिस जॉन्सन यांनी दिली. त्यांच्या या इशाऱ्यावर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी थेट धमकी दिली होती.

रशियाची क्षेपणास्त्रे एका मिनिटात लंडनला लक्ष्य करतील, असा गोठवून टाकणारा इशारा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आपल्याला दिला होता, असे जॉन्सन यांनी म्हटले आहे. हा इशारा रशियन राष्ट्राध्यक्षांनी अगदी सहजपणे दिला होता, ही बाब देखील बोरिस जॉन्सन यांनी आवर्जुन सांगितली. अतिशय गंभीर संभाषणादरम्यान राष्ट्राध्यक्ष पुतिन अतिशय शांत होते, ही बाब देखील जॉन्सन यांनी लक्षात आणून दिली. ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी केलेले हे दावे रशियाने फेटाळून लावले आहेत. रशियाने कुणालाही क्षेपणास्त्र हल्ल्याच्या धमक्या दिलेल्या नाहीत, असे रशियाच्या क्रेमलिनचे माध्यम सचिव दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटले आहे. ‘जर युक्रेन नाटोत सहभागी झाला, तर त्याचा अर्थ रशियाच्या सीमेवर अमेरिका व नाटोची क्षेपणास्त्रे येतील आणि ती काही मिनिटात मॉस्कोला लक्ष्य करू शकतील असा होते’ एवढेच राष्ट्राध्यक्ष पुतिन ब्रिटनच्या पंतप्रधानांबरोबरील संभाषणात म्हणाले होते, अशी माहिती दिमित्री पेस्कोव्ह यांनी दिली.

ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी रशियन राष्ट्राध्यक्षांवर हे आरोप केलेले असतानाच, अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री रॉबर्ट गेट्स यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फार मोठ्या महत्त्वाकांक्षा असल्याचा दावा केला आहे. आधीच्या काळात होता, तितकाच रशियाचा विस्तार करण्याची ऐतिहासिक जबाबदारी आपल्यावर आहे, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना वाटत असल्याचे रॉबर्ट गेट्स म्हणाले. वेगळ्या शब्दात रशियन राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनचे युद्ध आपली ही महत्त्वाकांक्षा साधण्यासाठीच छेडल्याचा आरोप करून अशा महत्त्वाकांक्षेने पछाडलेले पुतिन आपला हेतू साध्य करण्यासाठी काहीही करू शकतात, असे संकेत देण्याचा प्रयत्न अमेरिकेच्या माजी संरक्षणमंत्र्यांनी केला आहे. या आधी अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री कॉन्डोलिसा राईस यांनी देखील व्लादिमिर पुतिन यांच्यावर अशाच स्वरुपाचे आरोप केले होते.

‘पिटर द ग्रेट’सारखे महान रशियन साम्र्राज्य उभे करण्याचे स्वप्न राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पाहिलेले आहे, असा दावा राईस यांनी केला होता.

leave a reply