‘बोको हराम’च्या नायजरमधील हल्ल्यात 28 जणांचा बळी

28 जणांचा बळीनियामे – अल कायदाशी संलग्न असलेल्या ‘बोको हराम’ या दहशतवादी संघटनेने नायजरमध्ये घडविलेल्या भयंकर हल्ल्यात 28 जणांचा बळी गेला असून 100 हून अधिक जखमी झाले आहेत. हा अखेरचा हल्ला नाही, ख्रिस्तधर्मियांच्या सणाच्या आधी असे हल्ले चढविले जातील, अशी धमकी बोको हरामने दिली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुतेरस यांनी हा एक अमानवी हल्ला असल्याचे सांगून त्याचा कडक शब्दात निषेध नोंदविला आहे. काही तासांपूर्वीच या दहशतवादी संघटनेने नायजरच्या दक्षिणेकडे असलेल्या नायजेरीयामधून 300 हून अधिक मुलांचे अपहरण केले होते.

28 जणांचा बळीबोको हरामच्या दहशतवाद्यांनी शनिवारी नायजरच्या ‘दिफा’ येथील ‘तौमोर’ गावात घुसून येथील तब्बल 800 घरांना आगी लावल्या. त्यानंतर या आगीतून वाचण्यासाठी घराबाहेर पडलेल्या गावातील नागरिकांवर बेछूट गोळीबार केला. तर आगीतून आणि गोळीबारातून बचावलेल्या नागरिकांनी जवळच्या कोमादोगू नदीत उड्या घेतल्या. बोको हरामच्या गोळीबारात 10 जण, तर आगीत होरपळून 14 जण व नदीत बुडाल्याने चार जणांचा बळी गेला. दहशतवाद्यांनी लावलेल्या आगीत इथली 60 टक्के घरे बेचिराख झाली असून बोको हरामच्या भीतीने येथील जनता झुडूपात आणि शेजारच्या गावात लपून बसली आहेत.

28 जणांचा बळी

नायजेरियाच्या सीमेपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर हा हल्ला झाला. नायजर सरकार तसेच संयुक्त राष्ट्रसंघाने या हल्ल्यासाठी कुणालाही जबाबदार धरलेले नाही. पण बोको हरामच्या दहशतवाद्यांनी व्हिडिओ प्रसिद्ध करून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. या व्हिडिओतून बोको हरामच्या दहशतवाद्यांनी येत्या काळात असेच भीषण हल्ले चढविले जातील, असे धमकावले. तसेच दिफ्फातील ख्रिस्तधर्मिय आपल्यावर निशाण्यावर असतील, असा इशारा या दहशतवाद्यांनी दिला.

येत्या रविवारी नायजरमध्ये स्थानिक व क्षेत्रीय निवडणुका होत आहेत. तर तीन आठवड्यानंतर राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्याआधी बोको हरामच्या दहशतवाद्यांनी हल्ले चढवून नायजर सरकारला इशारा दिल्याचा दावा केला जातो. बोको हरामचे दहशतवादी नायजर, नायजेरिया, चाड आणि कॅमेरुन या चार आफ्रिकी देशांच्या सीमाभागात मोठ्या प्रमाणात हल्ले घडवित आले आहेत. या दहशतवादी हल्ल्यांमुळे लाखो जण विस्थापित झाल्याची चिंता संयुक्त राष्ट्रसंघ व्यक्त करीत आहे.

leave a reply