अफगाणिस्तानातील आत्मघाती स्फोटांमध्ये 34 जणांचा बळी

आत्मघाती स्फोटांमध्येकाबुल – अफगाणिस्तानातील गझनी व झाबुल प्रांतात घडविण्यात आलेल्या आत्मघाती स्फोटांमध्ये 31 जवानांसह 34 जणांचा बळी गेला आहे. या हल्ल्यांमध्ये 40हून अधिक जण जखमी झाले असून त्यात लहान मुलांचाही समावेश आहे. हल्ल्यांची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारली नसली तरी त्यामागे तालिबानचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. गेल्याच आठवड्यात अफगाणी सुरक्षादलांनी तालिबानविरोधात मोठी कारवाई करून अनेक दहशतवाद्यांना ठार केले होते. त्याचा सूड उगविण्यासाठी लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आले असावे, असा दावा सूत्रांनी केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानातून सैन्यमाघारीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, अमेरिकेचे फक्त 2,500 सैनिकच अफगाणिस्तानात तैनात राहणार आहेत. ट्रम्प यांच्या या निर्णयावर अमेरिकेतील त्यांचे विरोधक तसेच युरोपिय देशांनीही टीकास्त्र सोडले आहे. अमेरिकी लष्कराच्या माघारीनंतर अफगाणिस्तानातील दहशतवादी हल्ले वाढतील व ‘आयएस’सारख्या दहशतवादी संघटना देशावर ताबा मिळवितील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहेत. अमेरिकेतील एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकी लष्कराने अफगाणिस्तानमधील आपले 10 तळ बंदही केल्याचे समोर येत आहे.

आत्मघाती स्फोटांमध्ये

या पार्श्‍वभूमीवर, रविवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यांनी दहशतवादी संघटनांची ताकद पुन्हा एकदा वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. रविवारी सकाळी दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली ‘हमवी’ गाडी गझनीतील लष्करी तळावर धडकवली. त्यानंतर झालेल्या प्रचंड स्फोटात लष्कराचे 31 जवान जागीच ठार झाले तर 24 जण गंभीर जखमी झाले. यात तळावर तैनात असलेल्या कमांडोंचाही समावेश असल्याचे सांगण्यात येते.

आत्मघाती स्फोटांमध्ये

या हल्ल्यानंतर झाबुल प्रांतातील कलात शहरातही आत्मघाती स्फोट घडविण्यात आला. आत्मघाती हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेली गाडी स्थानिक प्रशासनाचे प्रमुख असलेल्या अताजान हकबयान यांच्या पथकावर आदळली. यावेळी झालेल्या स्फोटात तिघांचा बळी गेला असून 20 हून अधिक जण जखमी झाले. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

अमेरिकेकडून लष्करी माघार सुरू असतानाच अफगाणिस्तान सरकार व तालिबानमध्ये सुरू असलेली शांतीचर्चा अद्यापही पुढे सरकली नसल्याचे दिसत आहे. चर्चेत आपले वर्चस्व रहावे म्हणून तालिबान हल्ल्यांच्या माध्यमातून दडपण आणत असल्याचा आरोप अफगाण सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र तालिबानने हे आरोप फेटाळले आहेत. दोन्ही बाजूंमध्ये लांबलेल्या चर्चेचा फटका अफगाणी जनतेला बसत असल्याचे दहशतवादी हल्ल्यांच्या वाढत्या तीव्रतेतून स्पष्ट होत आहे.

leave a reply