ब्रिटन हमासला दहशतवादी संघटना घोषित करणार

- इस्रायलकडून स्वागत, तर हमासचा संताप

दहशतवादी संघटनालंडन/जेरूसलेम – गाझापट्टीतील हमास ही माथेफिरू, जहाल, ज्यूद्वेष्टी संघटना असून लवकरच तिचा समावेश दहशतवादी संघटनेत केला जाईल, अशी घोषणा ब्रिटनच्या अंतर्गत सुरक्षामंत्री प्रिती पटेल यांनी केली. त्यामुळे येत्या काळात ब्रिटनमध्ये हमासचा झेंडा फडकावणार्‍यांवर, सभा आयोजित करणार्‍यांवर तसेच हमाससाठी निधी गोळा करण्यार्‍यांवर कारवाई केली जाईल. हा महत्त्वाचा निर्णय असल्याचे सांगून इस्रायलने त्याचे स्वागत केले आहे. तर हमासने या निर्णयावर संताप व्यक्त केला असून ब्रिटनने आपण आधीच्या काळा केलेल्या चुकांची माफी मागावी, अशी मागणी केली.

मुस्लिम ब्रदरहूडची गाझापट्टीतील शाखा आणि इराण समर्थक बनलेली जहाल संघटना अशी हमासची ओळख आहे. १९८७ साली स्थापना झाल्यापासून हमासने इस्रायलच्या विनाशाच्या घोषणा दिल्या आहेत. हमासला इस्रायलचे अस्तित्त्वच मान्य नाही. त्यामुळे इस्रायलशी कुठल्याही प्रकारच्या वाटाघाटी व तडजोड शक्य नसल्याचे हमासचे म्हणणे आहे. सशस्त्र संघर्ष छेडून इस्रायलला संपवल्याखेरीस संपूर्ण पॅलेस्टाईनचा भूभाग मिळविता येणार नाही, अशी हमासची भूमिका आहे.

हमासचा लष्करी गट म्हणून ओळखली जाणारी ‘इझ अल-दीन अल-कासम ब्रिगेड’ किंवा ‘अल-कासम ब्रिगेड’ ही संघटना इस्रायलविरोधात सशस्त्र संघर्षाची कामगिरी पार पाडत आहे. आहेत. अमेरिका आणि युरोपिय महासंघाने हमासच्या राजकीय तसेच अल कासम ब्रिगेड या सशस्त्र संघटनेला दहशतवादी घोषित केले होते. तर ब्रिटनने फक्त अल कासम ब्रिगेडला दहशतवादी संघटना घोषित करून हमासला आजवर राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली होती.

दहशतवादी संघटनापण पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटनची सूत्रे हाती घेतल्यापासून ब्रिटनची यासंदर्भातील भूमिका बदलली आहे. हमासला दहशतवादी संघटना घोषित करून तिच्यावर बंदी टाकण्याचा निर्णय देखील जॉन्सन सरकारच्या आक्रमक भूमिकेचा भाग मानला जातो. ब्रिटनच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने हमासवरील कारवाईची बातमी प्रसिद्ध केली. ब्रिटनच्या अंतर्गत सुरक्षामंत्री प्रिती पटेल यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी सदर बातमीला दुजोरा दिला. तसेच पुढच्या आठवड्यात याची अधिकृत घोषणा केली जाईल, असे पटेल यांनी म्हटले आहे.

‘इस्रायलच्या विनाशाच्या घोषणा देणार्‍या हमासच्या राजकीय आणि लष्करी संघटनांमध्ये फरक करता येणार नाही. इस्रायलद्वेषाने भारलेली हमास ही मूळातच माथेफिरू, कट्टरपंथियांची सशस्त्र संघटना आहे, अशी टीका पटेल यांनी केली. यामुळे ब्रिटनमधील हमासच्या समर्थकांवरील कारवाई तीव्र होऊ शकते. हमाससाठी निधी गोळा करणार्‍यांना किमान १४ वर्षांसाठी कैद होत शकते. त्याचबरोबर हमासचे झेंडे हाती घेणार्‍यांना आणि सभा आयोजित करणार्‍यांनाही अटक होऊ शकते.

हमासने आपल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून ब्रिटनच्या या निर्णयावर संताप व्यक्त केला. ‘इतिहासात केलेल्या चुकांसाठी माफी मागायची सोडून आणि चुकांची दुरूस्ती करण्याऐवजी ब्रिटन पॅलेस्टिनींवर अत्याचार करणार्‍यांचे समर्थन करीत आहे’, असे टीकास्त्र हमासने सोडले. त्याचबरोबर इस्रायलच्या आक्रमकतेला सशस्त्र संघर्षाद्वारे उत्तर देणे, हा पॅलेस्टिनींचा अधिकार असल्याचे सांगून हमासने इस्रायलविरोधी संघर्ष सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले. तर ब्रिटनमधील आपल्या समर्थकांनी या निर्णयाला कडाडून विरोध करावा, असे आवाहन हमासने केले आहे.

leave a reply