‘ब्रेक्झिट डील’मधील मासेमारीच्या मुद्यावरून ब्रिटन-फ्रान्स संबंध चिघळले

मासेमारीलंडन/पॅरिस – ब्रिटन युरोपिय महासंघातून बाहेर पडून अनेक महिने उलटले असले तरी ‘ब्रेक्झिट’वरून होणारे वाद अद्यापही संपलेले नाहीत. आयर्लंड व ‘सॉसेजेस्’च्या वादानंतर आता ब्रिटन आणि फ्रान्समध्ये मासेमारीच्या हक्कांवरून तणाव निर्माण झाला आहे. फ्रान्सने ब्रिटनची नौका आपल्या बंदरात रोखून धरली असून वीजपुरवठा थांबविण्याचा इशारा दिला आहे. ब्रिटननेही फ्रेंच राजदूतांना समन्स धाडले असून कायदेशीर तक्रार दाखल करण्याचे बजावले आहे.

गेल्या वर्षाच्या अखेरीस ब्रिटन युरोपिय महासंघातून बाहेर पडला होता. मात्र त्यानंतरही ब्रिटन व महासंघादरम्यान झालेल्या कराराच्या अंमलबजावणीरून नवनवीन वाद समोर येत आहेत. ‘ब्रेक्झिट डील’नुसार ब्रिटनच्या सागरी क्षेत्रात येणार्‍या युरोपिय देशांच्या मासेमारी जहाजांना ब्रिटीश यंत्रणांकडून परवाने देण्यात येणार आहेत. या परवान्यांसाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींमध्ये न बसणार्‍या फ्रेंच जहाजांना परवाने नाकारण्यात आले आहेत. त्यामुळे फ्रान्समध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून फ्रेंच नेतृत्त्वाने हा मुद्दा युरोपच्या प्रतिष्ठेचा असल्याचा दावा केला आहे.

मासेमारीफ्रान्सच्या सरकारने युरोपातून ‘इंग्लिश चॅनल’मार्गे ब्रिटनमध्ये दाखल होणार्‍या उत्पादनांनी वाहतूक रोखण्याचा तसेच ब्रिटनला पुरविण्यात येणारी वीज खंडित करण्याचा इशारा दिला आहे. फ्रान्सच्या सरकारने युरोपिय महासंघाला उद्देशून पत्र लिहिले असून त्यात महासंघ सोडून जाणार्‍यांचे कसे नुकसान होते हे दाखवून देण्याची गरज आहे, असा आक्रमक सूर लावला आहे. ब्रिटनने ब्रेक्झिट करारातील अटी पाळाव्यात यासाठी महासंघाने आपला ठाम निर्धार व्यक्त करायला हवा, अशी मागणीही फ्रान्सने केली आहे.

फ्रान्सचे राष्ट्रअध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मासेमारीच्या प्रकरणात ब्रिटनची आंतरराष्ट्रीय स्तरावरील पत पणाला लागल्याचे बजावले आहे. त्यापाठोपाठ ब्रिटनकडून फ्रेंच हद्दीत मासेमारी करणारे एक जहाज फ्रेंच यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. सदर जहाजाकडेपरवाना मासेमारीनसल्याचा दावा करून फ्रेंच यंत्रणांनी ब्रिटीश जहाज ‘ली हॅवर’च्या किनारपट्टीवर रोखून धरले आहे. दरम्यान, फ्रान्समधील मच्छिमारांच्या संघटनेने दोन देशांमधील वादाचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसू शकतो, अशी चिंता व्यक्त केली आहे.

फ्रान्सकडून सुरू झालेल्या आक्रमक हालचालींवर ब्रिटनमधूनही तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. ब्रिटनने फ्रेंच राजदूतांना समन्स धाडले असून फ्रान्सच्या सरकारने दिलेल्या इशार्‍यांबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी, फ्रान्सने कराराचा भंग केल्याचा आरोप केला आहे. त्याचवेळी फ्रान्सने चिथावणी देणार्‍या कारवाया सुरू ठेवल्या तर कायदेशीर तक्रार दाखल करून कारवाई करु, असा इशारा पंतप्रधान जॉन्सन यांनी दिला. यापूर्वी ब्रिटनने फ्रान्ससह इतर युरोपिय देशांची जहाजे रोखण्यासाठी चार युद्धनौकाही तैनात केल्याचे उघड झाले होते.

leave a reply