डीआरडीओकडून ‘स्मार्ट ऍन्टी एअरफिल्ड वेपन’ची चाचणी

नवी दिल्ली/चेन्नई – संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) दोन दिवसांपूर्वी राजस्थानच्या पोखरणमध्ये ‘स्मार्ट ऍन्टी एअरफिल्ड वेपन’ची (एसएएडब्ल्यू) चाचणी घेतली आहे. ‘एसएएडब्ल्यू’द्वारे आपल्या वैमानिकांना धोक्यात न घालता, शत्रूच्या हवाई हद्दीत प्रवेश टाळून जमिनीवर लक्ष्याचा अचूक वेध घेता येतो. १०० किलोमीटर दूरूनच लक्ष भेदणारे ‘एसएएडब्ल्यू’ हे एक प्रकारचा गायडेड बॉम्ब असून ही या शस्त्रांची दहावी चाचणी होती. गेल्यावर्षीच भारत सरकारने वायुसेना व नौदलासाठी ‘एसएएडब्ल्यू’च्या खरेदीला मंजुरी दिली होती.

डीआरडीओकडून ‘स्मार्ट ऍन्टी एअरफिल्ड वेपन’ची चाचणीअग्नी-५ या अंतरखंडीय क्षेपणास्त्रांची चाचणी घेतल्यावर डीआरडीओने लागोपाठ दोन शस्त्रांच्या चाचण्या घेतल्या आहेत. यामध्ये लॉंग रेंंज बॉम्बचा (एलआर बॉम्ब) समावेश आहे. हजार किलो स्फोटके वाहून नेणार्‍या व १०० किलोमीटर मारक क्षमता असलेल्या एलआर बॉम्बची चाचणी शुक्रवारी २९ ऑक्टोबरला सुखोई-३० विमानातून ओडिशाच्या बालासोरमध्ये घेण्यात आली होती. ही या बॉम्बची पहिलीच चाचणी होती.

एलआर बॉम्बच्या चाचणीच्या काही तास आधी पोखरणमध्ये ‘स्मार्ट ऍन्टी एअरफिल्ड वेपन’ची (एसएएडब्ल्यू) चाचणी पार पडल्याचे वृत्त आहे. १२५ किलोग्रॅम वजनाचे हे स्मार्ट शस्त्र शत्रूच्या हवाई सीमेत शिरकाव न करताही लढाऊ विमानातून डागता येते व १०० किलोमीटर दूरवरूनच जमिनीवर लक्ष्याचा अचून भेद घेता येतो. शत्रूची हवाईतळ, रडार, बंकर्सना दुरूनच नष्ट करण्यासाठी हे प्रभावी अस्त्र ठरते, असा दावा केला जात आहे. हा एक प्रकारचा दूरुनच अचूक मारा करणारा हलक्या वजनाचा गायडेड बॉम्ब आहे. २०१२-१३ सालात ‘एसएएडब्ल्यू’च्या प्रोजेक्टसाठी भारत सरकारने ५६ कोटींच्या योजनेला मंजुरी दिली होती. वायुसेनेच्या गरजा ओळखून डीआरडीओने हे शस्त्र विकसित केले. २०१६ साली जग्वार लढाऊ विमानातून याची पहिली चाचणी पार पडली होती.

आतापर्यंत ‘एसएएडब्ल्यू’च्या १० चाचण्या पार पडल्या आहेत. जग्वारबरोबर सुखोई विमानातूनही ‘एसएएडब्ल्यू’चा मारा करता येतो. सध्या डीआरडीओ ‘एसएएडब्ल्यू’च्या इलेक्ट्रो-ऑप्टिकल सिकर आवृत्तीवरही काम करीत असल्याची माहिती मिळत आहे. या आवृत्तीत मारक क्षमतेत व अचूकतेमध्ये अधिक वाढ होईल, असा दावा केला जातो.

leave a reply