कोरोनाव्हायरसचे संकट टळल्यानंतरही ब्रिटनचे चीनबरोबरील संबंध पुर्वपदावर येणार नाहीत

ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांचा सज्जड इशारा

लंडन – कोरोनाव्हायरसचे संकट टाळले तरी पुढच्या काळात ब्रिटनचे चीनबरोबरील संबंध पूर्वपदावर येणे शक्य नाही, अशा भेदक शब्दात ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमनिक राब यांनी चीनला वास्तवाची जाणीव करून दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोनाव्हायरसच्या साथीला चीन जबाबदार असल्याचा आरोप करीत असून ब्रिटननेही त्यांच्या सुरात सूर मिसळत असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. इतकेच नाहीतर परराष्ट्रमंत्री राब यांनी कोरोनाव्हायरस नक्की कुठून आला, याची अत्यंत सखोल चौकशी करण्याची आवश्यकता व्यक्त केली असून हा चीनने छेडलेला जैविक युद्धाचा भाग असू शकतो, असा संशय व्यक्त केला आहे.

कोरोनाव्हायरस चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतून बाहेर आला का, याची चौकशी अमेरिका करीत असून ब्रिटन देखील स्वतंत्रपणे याची तपासणी करीत असल्याचे, ब्रिटनच्या माध्यमांचे म्हणणे आहे, या पार्श्वभूमीवर ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमनिक राब यांनी चीनला हा सज्जड इशारा दिला आहे. कोरोनाव्हायरसचे संकट टळले तरी पुढच्या काळात ब्रिटनचे चीनबरोबरील संबंध पूर्वपदावर येणे शक्यच नाही, अशा सुस्पष्ट शब्दात राब यांनी ब्रिटनची आक्रमक भूमिका मांडली आहे.

कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे ब्रिटनमध्ये जवळपास पंधरा हजार जणांचा बळी गेला असून एक लाख आठ हजाराहून अधिक जणांना याची लागण झाली आहे. यामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त हादरा बसला असून यातून सावरण्यासाठी बरीच वर्षे जावी लागतील, असे इशारे अर्थतज्ञांकडून दिले जात आहेत. एखाद्या युद्धात होणार नाही इतकी जबरदस्त हानी ब्रिटन व अमेरिकेसह युरोपीय देशांना सोसावी लागत आहे. चीनला याची किंमत चुकती करण्यास भाग पाडल्यावाचून अमेरिका व ब्रिटन स्वस्थ बसणार नाही, असा निर्वाळा विश्लेषक देऊ लागले आहेत. ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमनिक राब यांनी चीनला दिलेला इशारा हेच दाखवून देत आहे.

याबरोबरच डॉमनिक राब यांनी कोरोनाव्हायरसचा स्त्रोत चीनच्या वुहानमधली प्रयोगशाळा आहे का, याची कसून व सखोल चौकशी करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेली ही मागणी चीनने या संदर्भात दिलेले खुलासे स्वीकारता येण्याजोगे नसल्याचा संदेश देत आहेत. पुढच्या काळात चीनकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांवर आम्ही विश्वास ठेवणार नाही याची जाणीवही, परराष्ट्रमंत्री राब यांनी चीनला करून दिली आहे. अधिक स्पष्ट करून सांगायचं झाल्यास, चीनबरोबरील पाश्चिमात्य देशांचे राजनैतिक पातळीवरील युद्ध सुरू झाले असून, ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री राब यांनी फुंकल्याचे दिसते आहे.

याआधी अमेरिकेनेही चीनला असाच खरमरीत संदेश दिला होता व जपान, ऑस्ट्रेलिया आणि तैवाननेही अमेरिकेच्या चीनवरील आरोपांना दुजोरा दिला होता. यामुळे चीनला लवकरच अत्यंत बलाढ्य देशांच्या प्रबळ राजकीय आघाडीला तोंड द्यावे लागणार असल्याचे दिसत आहे. या देशांचे कोरोनाव्हायरसमुळे झालेले जबर आर्थिक नुकसान भरून देणाऱ्या व्यापारी सवलती चीनकडून मिळाल्याखेरीज, या देशांची ही चीनविरोधी मोहीम थांबणार नाही, असा निर्वाळा विश्लेषक देऊ लागले आहेत.

leave a reply