तुर्कीच्याविरोधात नाटोने ग्रीसला लष्करी सहकार्य करावे

ग्रीसचे आवाहन

अथेंस – ‘तुर्कीच्या कारवाईमुळे ग्रीसच्या सागरी सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नाटोने लढाऊ विमाने आणि युद्धनौका रवाना करुन आम्हाला लष्करी सहकार्य करावे’, अशी मागणी ग्रीसच्या संरक्षणमंत्र्यांनी केली आहे. तुर्की निर्वासितांच्या आडून कोरोनाग्रस्त रुग्णांना आपल्या देशात घुसविण्याच्या तयारीत असल्याचा आरोप याआधी ग्रीसने केला होता. तुर्की युरोपवर निर्वासित सोडण्यासाठी ग्रीसच्या सीमेला धडका देत असल्याने नाटोचे दोन सदस्य देश एकमेकांच्या विरोधात खडे ठाकल्याचे दिसत आहे.

नाटोच्या सदस्य देशांमधील कोरोनाव्हायरसचा फैलाव आणि नाटोची भूमिका यावर चर्चा करण्यासाठी नाटोच्या सदस्य देशांची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी ग्रीसचे संरक्षणमंत्री निकोस पॅनागियोतोपूलॉस यांनी तुर्कीकडून सुरू असलेल्या निर्वासितांच्या हालचालीचा मुद्दा उपस्थित केला. युरोपीय देशांना धमकावणारा तुर्की हजारो निर्वासितांचे लोंढे सागरीमार्गे ग्रीसमध्ये घुसविण्याच्या तयारीत आहे. भुमध्य समुद्रातील ग्रीसच्या बेटांवर निर्वासितांचे हे लोंढे धडकू शकतात. यामुळे ग्रीसच्या सागरी सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे सांगून संरक्षणमंत्री निकोस यांनी नाटोकडे लष्करी सहाय्याची मागणी केली.

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी फेब्रुवारी महिन्यात ग्रीसच्या सीमेतून १० हजार निर्वासित घुसविण्याची धमकी दिली होती. यासाठी तुर्कीच्या लष्कराने ग्रीसच्या सीमसुरक्षा जवानांवर अश्रधूराचे हल्ले केले होते, याची माहिती संरक्षणमंत्री निकोस यांनी दिली. त्यावेळी निर्वासितांची घुसखोरी करण्यात तुर्की अपयशी ठरली होती. मात्र यावेळी तुर्की किमान ४५ हजार निर्वासितांचे लोंढे ग्रीसमध्ये घुसविण्याच्या तयारीत असल्याचे सॅटेलाईट फोटोग्राफ्समधून उघड झाल्याचे संरक्षणमंत्री निकोस यांनी लक्षात आणून दिले.

‘ग्रीसचे लष्कर आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज आहे. पण नाटोचा सदस्यदेश असलेल्या ग्रीसला नाटोच्या सहकार्याची अपेक्षा आहे. तेव्हा ग्रीसच्या बेटांच्या सुरक्षेसाठी नाटोने विमाने आणि युद्धनौका तैनात कराव्यात’, असे आवाहन संरक्षणमंत्री निकोस यांनी या बैठकीत केले. ग्रीस व तुर्की हे दोन्ही नाटोचे सदस्य देश असल्यामुळे हा पेच निर्माण झाला आहे. त्यामूळे नाटोने ग्रीसची ही मागणी फेटाळली. पण ग्रीस व तुर्कीतील या सागरी तणावावर नाटोचे प्रमुख जेम्स स्टोल्टनबर्ग यांनी चिंता व्यक्त केली.

leave a reply