कोरोनाची लस पुरविण्याच्या आघाडीवर विषमता नको

- संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे आवाहन

संयुक्त राष्ट्रसंघ – भारताने आपल्या जनतेपेक्षाही अधिक संख्येने कोरोनाप्रतिबंधक लसी जगाला पुरविलेल्या आहेत. मात्र कोरोनाच्या या लसींचा गरीब देशांना पुरवठा झाला नाही आणि या आघाडीवर विषमता दाखविली, तर कोरोनाच्या विरोधातील लढाच्या एकजुटीवर याचा विपरित परिणाम होईल, असा इशारा भारताने संयुक्त राष्ट्रसंघाला दिला आहे. संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे प्रतिनिधी के. नागराज नायडू यांनी अत्यंत परखड शब्दात कोरोनाची लस अविकसित व गरीब देशांना पुरविण्यास नकार देणार्‍या श्रीमंत देशांना वास्तवाची जाणीव करून दिली.

कोरोनाप्रतिबंधक लसींच्या पुरवठ्यावरून विकसित देशांमध्येच जुंपली आहे. अमेरिका व युरोपातले विकसित देश जास्तित जास्त प्रमाणात कोरोनाच्या लसींचा साठा करून त्या आपल्याच जनतेला मिळाव्या, यासाठी धडपडत आहेत. यामुळे गरीब व अविकसित देशांची परिस्थिती बिकट बनली आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली, तर या गरीब देशांमध्ये कोरोनाचे संकट उग्ररूप धारण करील, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाकडून दिला जातो. मात्र त्याचा विशेष परिणाम अमेरिका व युरोपिय देशांवर झालेला नाही. यासंदर्भातील पेटंट खुले करावे, ही मागणीही या देशांकडून फेटाळली जात आहे.

अशा परिस्थितीत भारताने आपल्या देशात विकसित झालेल्या लसींचा गरीब व अविकसित देशांना पुरवठा केला. संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य असलेल्या १८० हून अधिक देशांना कुठल्याही प्रकारची विषमता न दाखवता या लसींचा पुरवठा व्हावा, अशी भारताची मागणी आहे. यासाठी पुढाकार घेऊन भारताने आत्तापर्यंत सुमारे ७० हून अधिक देशांना कोरोनाप्रतिबंधक लसींचा पुरवठा केला. याबाबतची माहिती देऊन संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे प्रतिनिधी के. नागराज नायडू यांनी विकसित देशांना खडे बोल सुनावले.

कोरोना रोखण्यासाठी झटत असलेल्या आपल्या सुमारे ३० कोटीहून अधिकजणांना भारत पुढच्या सहा महिन्यात कोरोनाची लस पुरविणार आहे. मात्र आपल्या जनतेला पुरविली त्याहूनही अधिक प्रमाणात भारताने जगातील इतर देशांना कोरोनाची लस पुरविलेली आहे, असे नायडू यांनी स्पष्ट केले. पुढच्या काळात गरीब व अविकसित देशांना कुठल्याही प्रकारची विषमता न दाखवता कोरोनाची लस मिळावी, अशी भारताची अपेक्षा यावेळी नायडू यांनी व्यक्त केली. कोरोनाची लस पुरविण्याच्या आघाडीवर विषमता असून चालणार नाही. त्याचा कोरोनाच्या विरोधातील लढ्यावर विपरित परिणाम होईल, असे नायडू यांनी बजावले आहे.

सध्या या आघाडीवर दाखविली जाणारी विषमता कोरोनाविरोधातील लढ्याच्या एकजुटीसाठी घातक ठरते आहे, असेही नायडू यांनी बजावले. कोरोनाची लस पुरविणार्‍या भारताच्या ‘वॅक्सिन मैत्री’ उपक्रमाचे जगभरात स्वागत होत आहे. ही लस मिळालेल्या देशांमधील नागरिक भारताचे मनापासून आभार मानत आहेत. यामुळे भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रभाव अधिकच वाढल्याचे दिसू लागले आहे. सध्या ‘कोरोना प्रतिबंधक लस’ म्हणजे नवे राजनैतिक चलन बनले आहे व भारत त्याचा अत्यंत प्रभावीरित्या वापर करीत असल्याचे दावेही केले जातात. याचा सर्वाधिक फटका चीनला बसल्याचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

leave a reply