रशियाबरोबरील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर ब्रिटन युक्रेनला दहा युद्धनौका पुरविणार

दहा युद्धनौकालंडन/किव्ह/मॉस्को – युक्रेनच्या मुद्यावरून रशिया व पाश्‍चात्य देशांमधील तणाव वाढत असतानाच ब्रिटनने युक्रेनबरोबर संरक्षणकरार करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांच्या युक्रेन दौर्‍यात यावर एकमत झाले असून कराराचा प्राथमिक टप्पा पार पडल्याचे सांगण्यात येते. या करारानुसार ब्रिटन युक्रेनला १० युद्धनौका व संरक्षणयंत्रणा पुरविणार आहे. ब्रिटन व युक्रेनमधील या कराराच्या पार्श्‍वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पुन्हा एकदा पाश्‍चात्य देशांवर युक्रेनमधील परिस्थिती चिघळविण्याचा आरोप केला.

गेल्याच आठवड्यात ब्रिटनचे संरक्षणदलप्रमुख सर जनरल निक कार्टर यांनी, शीतयुद्धानंतर प्रथमच पाश्‍चात्य देश व रशियामध्ये युद्ध भडकण्याचा धोका सर्वोच्च स्तरावर पोहोचला आहे, असा इशारा दिला होता. त्यानंतर युरोपला युक्रेन व रशियन इंधन यामधून एकाची निवड करावी लागेल, असे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी बजावले होते. याचदरम्यान, युक्रेनला पाठिंबा दर्शविण्यासाठी ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी युक्रेनचा दौरा करून परिस्थितीची माहिती घेतली.

या दौर्‍यात, ब्रिटन व युक्रेनदरम्यान संरक्षणसहकार्याच्या मुद्यावर महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. या चर्चेत दोन्ही देशांमध्ये संरक्षणकरारावर एकमत झाले आहे. ब्रिटन व युक्रेनमधील हा करार २.२९ अब्ज डॉलर्सचा आहे. या करारानुसार, ब्रिटन युक्रेनला दोन ‘माईनहंटर्स’ पुरविणार आहे. त्याव्यतिरिक्त आठ ‘मिसाईल शिप्स’ व एक विनाशिकांची संयुक्त उभारणी करण्यात येणार आहे. ब्रिटन युक्रेनच्या नौदलाला शस्त्रास्त्रेही पुरविणार आहे. सदर कराराच्या प्राथमिक टप्प्यावर स्वाक्षर्‍या झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दहा युद्धनौका‘युक्रेनच्या सीमेवर रशियाकडून सुरू असलेली लष्कराची जमवाजमव व इतर हालचाली चिंताजनक आहेत. युक्रेनचे सार्वभौमत्त्व व क्षेत्रीय एकात्मतेला आव्हान दिले जाऊ शकत नाही’, असे ब्रिटन व युक्रेनच्या संरक्षणमंत्र्यांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात बजावले आहे. काही महिन्यांपूर्वी ब्रिटनच्या एका युद्धनौकेने युक्रेन व रशियामध्ये असलेल्या सागरी क्षेत्रात गस्त घातली होती. त्यावेळी रशियन नौदलाने ब्रिटीश युद्धनौकेला धमकविल्याची व बॉम्ब टाकण्याचा इशारा दिल्याचे समोर आले होते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी यावरून ब्रिटनला इशारा दिला होता. ही बाब लक्षात घेता ब्रिटनने युक्रेनबरोबर संरक्षणकराराचा निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते. या कराराच्या पार्श्‍वभूमीवर रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पुन्हा एकदा पाश्‍चात्य देशांना लक्ष्य केले. रशियन सीमांनजिक तसेच युक्रेनच्या हद्दीत पाश्‍चात्य देशांच्या हालचाली वाढत आहेत. या हालचाली संघर्षाला चिथावणी देणार्‍या ठरु शकतात, असे पुतिन यांनी बजावले. पुतिन यांच्या इशार्‍यावर अमेरिकेकडून प्रतिक्रिया उमटली आहे.

‘रशियाच्या लष्करी हालचाली व आक्रमकता गंभीर चिंता निर्माण करणारी बाब ठरते. रशियाने युक्रेननजिकच्या क्षेत्रातील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत’, असे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन साकी म्हणाल्या. नाटोनेही रशियावर टीकास्त्र सोडले असून यापूर्वीच्या काळात रशियाने इतर देशांमध्ये हस्तक्षेप तसेच त्यांच्यावर आक्रमण केले होते, याची आठवण नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी करून दिली.

युक्रेनवरील लष्करी दडपण वाढविण्यासाठी व तणाव निर्माण करण्यासाठी रशियाने युक्रेनच्या सीमेजवळ ९० हजारांहून अधिक जवान तैनात केल्याची माहिती समोर आली आहे. रशियाच्या हा हालचालींना प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेसह नाटो सदस्य देश सक्रिय झाले आहेत. युक्रेनसह युरोपिय सदस्य देशांमधील संरक्षणसज्जता वाढविण्यात आली असून लढाऊ विमाने तसेच युद्धनौकांच्या फेर्‍यांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे इथला तणाव अधिकच चिघळू लागल्याचे दिसत आहे.

leave a reply