कोरोनाची लाट युरोपमध्ये आणखी तीन लाखजणांचा बळी घेईल

- ब्रिटीश युनिव्हर्सिटीच्या अहवालातील इशारा

कोरोनाची लाटलंडन/बर्लिन – कोरोनाच्या लाटेत युरोपमध्ये आणखी तीन लाख जणांचा बळी जाऊ शकतो, असा गंभीर इशारा ब्रिटीश युनिव्हर्सिटीच्या अहवालात देण्यात आला आहे. त्याचवेळी सुमारे १० लाख रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची वेळ येऊ शकते, असेही या अहवालात बजावण्यात आले आहे. हा इशारा प्रसिद्ध होत असतानाच जर्मनीच्या आरोग्यमंत्र्यांनी कोरोनाच्या वाढत्या तीव्रतेमुळे देशात आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. तर जर्मनीचा शेजारी देश असणार्‍या ऑस्ट्रियाने देशभरात पुन्हा ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली.

काही महिन्यांपूर्वी जगाच्या विविध भागांमध्ये कोरोनाची व्याप्ती हळुहळू कमी होत असल्याचे चित्र समोर आले होते. रुग्ण तसेच बळींची संख्या घटण्यास सुरुवात झाल्याने अनेक देशांनी निर्बंध उठवून दैनंदिन व्यवहार तसेच अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू केले. यात युरोप व अमेरिका आघाडीवर होते. लसीकरणाची मोहीम व किमान निर्बंध या जोरावर युरोपिय देश तसेच अमेरिकेत जनजीवन सामान्य होण्यास सुरुवात झाली होती. मात्र सप्टेंबर महिन्याच्या अखेरपासून हे चित्र बदलू लागल्याचे दिसून येत आहे.

लसीकरणाच्या मोहिमेचा वेग मंदावणे व सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे उल्लंघन यासह उत्तर गोलार्धात चालू झालेल्या हिवाळ्यामुळे युरोपिय देशांसह अमेरिकेतही रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. मात्र याचा सर्वाधिक फटका युरोपिय देशांना बसत आहे. ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (डब्ल्यूएचओ) जगभरात फक्त युरोपातच कोरोनाची तीव्रता वाढत असल्याकडे लक्ष वेधले आहे. फक्त लसीकरण नाही तर त्याबरोबर इतर नियमांचे पालनही आवश्यक असल्याचे युरोपममधील वाढती रुग्णसंख्या दाखवून देते, याची जाणीवही ‘डब्ल्यूएचओ’च्या तज्ज्ञांनी करून दिली.

युरोपातील नेदरलॅण्डस्, झेक रिपब्लिक, जर्मनी, फ्रान्स व ऑस्ट्रिया या देशांमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात ३० ते ५० टक्के रुग्णवाढ दिसून आली आहे. जर्मनीत दररोज आढळणार्‍या रुग्णांची संख्या ६० हजारांनजिक पोहोचली आहे. रुग्णालयांमधील अतिदक्षता विभाग जवळपास पूर्ण क्षमतेने भरल्याची माहिती जर्मनीच्या आरोग्य यंत्रणांनी दिली. जर्मनीच्या काही प्रांतांमध्ये कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लष्करी तैनातीही सुरू झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर जर्मनीच्या आरोग्यमंत्र्यांनी देशात आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्याकडे लक्ष वेधले व पुन्हा ‘लॉकडाऊन’ लादण्याचा इशारा दिला आहे.

जर्मनीचा शेजारी देश असणार्‍या ऑस्ट्रियाने गेल्या आठवड्यात लस न घेतलेल्या नागरिकांसाठी (अनव्हॅक्सिनेटेड) स्वतंत्र लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र त्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात न आल्याने आता देशभरात पूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. ऑस्ट्रियापाठोपाठ नेदरलॅण्डस्मध्येही लॉकडाऊनचे संकेत देण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर ब्रिटीश युनिव्हर्सिटीच्या अहवालातील इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

ब्रिटनच्या ‘लंडन स्कूल ऑफ हायजिन व ट्रॉपिकल मेडिसिन’ या युनिव्हिर्सिटीच्या अभ्यासात युरोपमधील कोरोनाबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. युरोपातील १९ देशांमधील कोरोनाच्या साथीचा अभ्यास करून अहवाल तयार करण्यात आल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले. सध्या सुरू असलेली कोरोना लाटेची भयावहता अजून वाढणार असून त्यात तीन लाख जणांचा बळी जाऊ शकतो, असे बजावले आहे. युरोपिय देशांमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल कराव्या लागणार्‍या रुग्णांमध्येही सुमारे १० लाखांची भर पडू शकते, असे ब्रिटीश संशोधकांनी म्हटले आहे.

leave a reply