‘एसएसएलव्ही’च्या यशस्वी प्रक्षेपणाने छोट्या उपग्रहांच्या बाजारपेठेत ‘इस्रो’चा दबदबा वाढणार

satellite marketश्रीहरिकोटा – पृथ्वीच्या कक्षेत कमी उंचीवर छोट्या उपग्रहांना प्रक्षेपित करण्यासाठी ‘इस्रो’ने विकसित केलेल्या ‘एसएसएलव्ही’द्वारे आखण्यात आलेली मोहीम यशस्वी ठरली आहे. शुक्रवारी सकाळी ‘एसएसएलव्ही’च्या सहाय्याने ‘ईओएस-07’ या अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रहासह एकूण तीन उपग्रह अवकाशात पाठविण्यात आले व पृथ्वीच्या वर्तुळाकार कक्षेत 450 किलोमीटर उंचीवर स्थिर झाले. याआधी ‘स्मॉल सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल’ची (एसएसएलव्ही) पहिली मोहीम तांत्रिक बिघाडामुळे अपयशी ठरली होती. मात्र असलेल्या त्रूटी दूर करून अवघ्या सहा महिन्याच्या आत ‘एसएसएलव्ही’द्वारे नवी मोहीम आखण्यात आली. ‘एसएसएलव्ही’ या रॉकेट प्रक्षेपकामुळे छोट्या उपग्रहांच्या बाजारपेठेत भारताची हिस्सेदारी वाढेल, असा दावा करण्यात येत आहे.

शुक्रवारी सकाळी 9 वाजून 18 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून ‘एसएसएलव्ही’च्या सहाय्याने तीन उपग्र्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. यामध्ये ‘ईओएस-07’ हा प्रमुख उपग्रह होता. इस्रोच्या अर्थ ऑब्झर्वेशन उपग्र्रह यंत्रणेचा भाग असलेल्या या उपग्रहाचे वजन 156.3 किलो होते. तर या जोडीला अवकाशात सोडण्यात आलेल्या ‘अंतारिस स्पेस’ या अमेरिकन कंपनीचा 10.2 किलो वजनाचा ‘जानुस-1’ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यात आला. तसेच स्पेस किडज्‌‍ इंडिया या चेन्नईतील संस्थेच्या विद्यार्थींनींनी बनविलेला ‘आझादीसॅट-2’ हा 8.2 किलोमीटर वजनाचा उपग्रहही ‘एसएसएलव्ही’द्वारे सोडण्यात आला.

SSLV-D2 launch7 ऑगस्ट 2022 रोजी इस्रोने ‘एसएसएलव्ही’ची पहिली मोहीम आखली होती. मात्र ती आंशिकरित्या अपयशी ठरली होती. याद्वारे सोडण्यात आलेले उपग्रह निश्चित करण्यात आलेल्या कक्षेपेक्षा वेगळ्या कक्षेत गेले होते. प्रक्षेपणाच्या दुसऱ्या टप्प्यात नेव्हिगेशन प्रणाली व काही सेंसर्समध्ये आलेल्या बिघाडामुळे हे घडून आले होते. मात्र ‘एसएसएलव्ही’ हे इस्रोचे महत्त्वाकांक्षी रॉकेट प्रक्षेपक असून आपल्या पहिल्याच मोहिमेत आलेल्या अपयशातील त्रूटींचा अभ्यास करुन इस्रोने सहा महिन्याच्या आतमध्ये दुसरी मोहीम राबवून ही फत्ते केली. ‘एसएसएलव्ही डी2’द्वारे ‘ईओएस-07’, ‘जानुस-1’ आणि ‘आझादीसॅट-2’ पृथ्वीच्या खालील कक्षेत यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले.

‘एसएसएलव्ही’ हे रॉकेट प्रक्षेपक खास पृथ्वीच्या खालील कक्षेत पाठविण्यात येणाऱ्या छोट्या उपग्रहांसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोने विकसित केले आहे. पृथ्वीच्या कक्षेत 500 किलोमीटरवर 10 ते 500 किलो वजनाचे उपग्रह याद्वारे पुढील काळात सोडण्यात येणार आहेत. याआधी इस्रोतर्फे ‘पीएसलव्ही’ व ‘जीएसएलव्ही’द्वारे अंतराळ मोहीमा राबविण्यात येत होत्या. मात्र ‘जीएसएलव्ही’ हे अवजड उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी वापरले जाते. इस्रोने ‘लॉन्च व्हेईकल मार्क-3’ सुद्धा तयार केले असून याद्वारे अति अवजड उपग्रहांसाठी मोहीमा राबविण्यात येतात. तर पीएसएलव्ही हे तीन ते चार टनापर्यंतचे उपग्रह घेऊन जाण्यास सक्षम आहे. या दोन्ही प्रक्षेपकाद्वारे अंतराळात वरच्या थरात उपग्रह प्रक्षेपित करता येतात. मात्र लहान उपग्रहांसाठी असे स्वतंत्र प्रक्षेपक विकसित करण्यात आले नव्हते. त्यामुळे पीएसएलव्हीद्वारे छोट्या उपग्रहांसाठी अशा मोहिमा राबविणे खर्चिक ठरत होते.

मात्र ‘एसएसएलव्ही’मुळे छोट्या उपग्रहांना अवकाशात सोडण्याचा खर्च कमी होणार आहे. छोट्या उपग्रहांसाठी आखण्यात येणाऱ्या अंतराळ मोहिमेचा खर्च कमी व्हावा आणि या बाजारपेठेत आपले स्थान भक्कम व्हावे, हे लक्षात घेऊनच इस्रेोने ‘एसएसएलव्ही’ विकसित केले आहे. ‘एसएसएलव्ही’द्वारे एका लहान उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी सुमारे 30 कोटी रुपये खर्च येतो. तेच ‘पीएसएलव्ही’द्वारे मोहीम राबविण्यासाठी 130 ते 200 कोटी रुपये खर्च येतो. त्यामुळे इस्रोचे ‘एसएसएलव्ही’ छोट्या उपग्रहांच्या प्रक्षेपण क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणणारे ठरेल, असा दावा केला जात आहे. या क्षेत्रातील बाजारपेठेत भारताचा दबदबा वाढेल. अनेक परदेशी ग्राहक इस्रोला मिळतील. यातून मोठ्या प्रमाणावर परकीय चलनही देशाला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

leave a reply