सौदीकडे ९० हजार टन युरेनियमचा साठा आहे

-ब्रिटिश वर्तमानपत्राची माहिती

रियाध – सौदी अरेबियामध्ये किमान ९० हजार टन युरेनियमचा साठा आहे. सौदीच्या अणुप्रकल्पासाठी आवश्यक अणुइंधनाच्या निर्मितीसाठी हा साठा पुरेसा असून सौदी अतिरिक्त युरेनियमची निर्यातही करू शकतो. चिनी भूगर्भशास्त्रज्ञांनी तयार केलेल्या अहवालातील माहिती ब्रिटनच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केली. इराणबरोबर आण्विक शस्त्रस्पर्धेत उतरलेला सौदी या युरेनियमचा वापर करुन स्वत:चा अण्वस्त्रनिर्मितीचा कार्यक्रमही राबवू शकतो, अशी चिंता आंतरराष्ट्रीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत. चीनच्या सहाय्याने अणुकार्यक्रम राबविणारा सौदी अणुबॉम्ब निर्मितीच्या दिशेने प्रवास करीत असल्याची चिंता अमेरिकेने गेल्या महिन्यातच व्यक्त केली होती.

सौदी अरेबिया आणि चीनमध्ये झालेल्या अणुकराराप्रमाणे सदर अणुप्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या युरेनियमचे संशोधन नुकतेच पूर्ण झाले. ‘बीजिंग रिसर्च इन्स्टिट्युट ऑफ युरेनियम जिओलॉजी’ आणि ‘चायना नॅशनल न्युक्लिअर कॉर्पोरेशन’ने सौदीच्या कंपनीसोबत हे संशोधन पूर्ण केले. सौदीमध्ये युरेनियमचा पर्याप्त साठा असल्याचे याआधीच जाहीर करण्यात आले होते. पण सौदी आणि चीनच्या भूगर्भशास्त्रज्ञांनी तयार केलेल्या अहवालानुसार सौदीतील तीन ठिकाणी ९० हजार टनाहून अधिक युरेनियमचा साठा सापडला आहे. नियोम शहराच्या उत्तरेकडे युरेनियम धातूची सर्वात मोठी खाण सापडली आहे. सौदीच्या अणुकार्यक्रमासाठी ही फार मोठी घडामोड असून यापुढे सौदीला युरेनियमसाठी कुठल्याही देशावर अवलंबून रहावे लागणार नाही.

२०१९ सालच्या सर्वेक्षणानुसार, सौदीकडे मोठ्या प्रमाणात युरेनियमचा साठा असल्याचे उघड झाले होते. यातील आवश्यक युरेनियम अणुप्रकल्पासाठी ठेवून सौदीने अतिरिक्त युरेनियमचा साठा निर्यात करण्याचे संकेतही दिले होते. पण युरेनियमबाबत स्वयंनिर्भर बनलेला सौदी अणुइंधनातील युरेनियमची संख्या वाढवून लष्करी अणुकार्यक्रम राबवू शकतो, असा इशारा ‘कार्नी एन्डॉमेंट फॉर पीस’ या आंतरराष्ट्रीय अभ्यासगटाचे वरिष्ट विश्लेषक मार्क हिब्स यांनी दिला. तर सौदी ज्या आक्रमकतेने आपला अणुकार्यक्रम राबवित आहे, ते पाहता युरेनियमचा वापर करुन सौदी अण्वस्त्रनिर्मितीसाठी प्रयत्न करू शकतो, असा दावा ‘ब्रुकिंग्ज इन्स्टिट्युशन’चे अभ्यासक ब्रुस रिडल यांनी केला.

२०१८ साली सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी इराण अण्वस्त्रसज्ज झाल्यास सौदीही मागे राहणार नसल्याचे जाहीर केले होते, याची आठवण ब्रिटिश वर्तमानपत्राने करुन दिली. चीनबरोबरचे अणुसहकार्य सौदीला अण्वस्त्रसज्जतेकडे नेऊ शकते, असे या वर्तमानपत्राने म्हटले आहे. असे झाल्यास अमेरिका, इस्रायल यांच्याकडून सौदी-चीन अणुसहकार्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते. सौदीने संयुक्त अरब अमिरात’प्रमाणे (युएई) आंतरराष्ट्रीय निरिक्षकांच्या चौकटीत आपला अणुकार्यक्रम राबवावा, असे आवाहन गेल्याच महिन्यात अमेरिकेने केले होते. तर इस्रायलने देखील सौदी-चीन अणुसहकार्यावर आपली नाराजी व्यक्त केली होती.

leave a reply