जम्मू- काश्मीरमधील सीमेवरील दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न ‘बीएसएफ’ने उधळला

जम्मू – जम्मू आणि काश्मीरच्या सांबामधल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न ‘सीमा सुरक्षा दला’ने (बीएसएफ) उधळून लावला. यावेळी दहशतवाद्यांना संरक्षण देण्यासाठी पाकिस्तानकडून जोरदार गोळीबारही करण्यात आला. मात्र यानंतरही बीएसएफने हा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पडला. गेल्या बारा दिवसात ‘बीएसएफ’ने दोन वेळा पाकिस्तानी दहशतवाद्यांची घुसखोरी रोखली आहे. भारतीय सुरक्षादलांच्या जोरदार मोहिमेमुळे पाकिस्तानची अस्वस्थता वाढली आहे.या निराशेतून पाकिस्तानच्या सीमेवरील कुरापती वाढल्या आहेत.

घुसखोरीचा प्रयत्न

शनिवार आणि रविवारच्या रात्रीच्या सुमारास ‘बीएसएफ’ला सीमेपलीकडून संशयास्पद हालचाली दिसून आल्या . यानंतर ‘बीसएफ’चे जवान अधिक सतर्क झाले होते. पाच दहशतवादी अंधार आणि वाढलेल्या गवताचा फायदा घेऊन पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने भारतात घुसण्याच्या तयारीत होते. हे स्पष्ट झाल्यानंतर ‘बीएसएफ’ने दहशतवाद्यांवर गोळीबार सुरु केला. यावेळी पाकिस्तानी लष्कराने गोळीबार करून दहशतवाद्यांना संरक्षण दिले.

पाकिस्तान लष्कर आणि बीएसएफच्या जवानांमध्ये जवळपास ३० मिनिटे चकमक सुरु होती. भारतीय जवानांच्या चोख प्रत्युत्तरामुळे दहशतवाद्यांनी तिथून पळ काढला. त्यानंतर ‘बीएसएफ’ने शोधमोहीम राबविली. पण कोणताही शस्त्रसाठा सापडला नसल्याचे ‘बीएसएफ’ने म्हटले. कारण गेल्या काही दिवसांमध्ये ड्रोनने जम्मू-काश्मीरच्या नियंत्रणरेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमाभागात शस्त्रात्रे ड्रॉप करण्याचे प्रमाण वाढले आहे.

दरम्यान, रविवारी रात्री जम्मू- काश्मीरच्या पुलवामामधल्या अवंतीपुरामध्ये लष्कर, ‘केंद्रीय राखीव पोलीस दल'(सीआरपीएफ) आणि जम्मू- काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले असून यात एका ‘लश्कर’च्या कमांडरचा समावेश होता, अशी माहिती जम्मू- काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली. त्याचवेळी अवंतीपुरामध्ये शोधमोहिमेदरम्यान शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. यामध्ये दोन ‘एके रायफल्स’, चार मॅगझीन व काडतूसांचा समावेश आहे.

leave a reply