छत्तीसगडमध्ये ‘आयटीबीपी’च्या ‘सोफिया’ मुळे मोठा अनर्थ टळला

राजनांदगाव – छत्तीसगडमधील इंडो- तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीपी) बॉम्ब शोधक पथकामध्ये असलेल्या ‘सोफिया’ या स्निफर डॉगने माओवाद्यांनी पेरलेला ‘आयईडी’ शोधून काढल्याने मोठा अनर्थ टळला. माओवाद्यांविरोधातील मोहिमेला अधिक बळकटी देण्यासाठी काही महिन्यापूर्वीच छत्तीसगडमध्ये ‘आयटीबीपी’च्या अतिरिक्त जवानांना तैनात करण्यात आले होते.

'सोफिया'

माओवाद्यांनी जवानांना लक्ष्य करण्यासाठी बेगा सालेवारा ते समुदपानी दरम्यान बांधण्यात येत असलेल्या रस्त्याजवळ ‘आयईडी’ पेरून ठेवला होता. राजनांदगाव जिल्ह्यातील पंढरीपाणी गावाजवळ पेरण्यात आलेला हा ‘आयईडी’ ७ किलोचा होता. आयटीबीपीचे जवान या भागातून गस्त घालत असताना या भागात ‘आयईडी’ असल्याचे या स्निफर डॉगने निदर्शनास आणून दिले.

त्यानंतर ४० बटालियन आईटीबीपीच्या जवानांनी हा ‘आयईडी’ तात्काळ निकामी केला. सोफिया उर्फ शिक्षा या स्निफर डॉगमुळे जवानांचे आणि रस्ता बांधण्याचे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्राण वाचल्याचे ‘आयटीबीपी’ने म्हटले आहे. या स्निफर डॉगला हा ‘आयईडी’ सापडला नसता तर दुसऱ्या दिवशी माओवाद्यांनी तो उडवून दिला असता. तसे झाले असते तर मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली असती असे सूत्रांनी सांगितले.

छत्तीसगडममध्ये माओवाद्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे माओवाद्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे माओवाद्यांकडून जवानांना लक्ष्य करण्यात येत आहे. याचबरोबर विकास कामांमध्ये अडथळे आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. विकासकामांमध्ये अडथळे आणून स्थानिकांमध्ये सरकारविरोधात रोष वाढवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र सुरक्षादलाकडून हे प्रयत्न हाणून पाडण्यात येत आहेत.

leave a reply