चीनकडून एकाचवेळी पाच युद्धसरावांचे आयोजन

बीजिंग – ‘बोहोई सी’, ‘यलो सी’, ‘ईस्ट चायना सी’ आणि ‘साऊथ चायना सी’ या चार सागरी क्षेत्रात पाच युद्धसरावांचे एकाचवेळी आयोजन करुन चीनने शक्तीप्रदर्शनाची तयारी केली आहे. गेल्या महिन्यातही चीनने अशाच प्रकारे चार युद्धसरावांचे आयोजन करुन दंड थोपटले होते. तर अमेरिकेने लांब पल्ल्याचे टेहळणी विमान रवाना करुन चीनला इशारा दिला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जपान, तैवान तसेच आग्नेय आशियाई देशांकडून चीनच्या सागरी दावेदारीला आव्हान दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर शक्तीप्रदर्शन करुन चीन या क्षेत्रात वर्चस्व गाजवित असल्याचे दिसत आहे.

पाच युद्धसरावांचे आयोजन

चीनच्या ‘मेरीटाईम सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशन’ने आपल्या संकेतस्थळावर या प्रत्येक युद्धसरावाची माहिती दिली आहे. चीनच्या नौदलातील प्रगत विनाशिकांचा ताफा एकाचवेळी चार सागरी क्षेत्रात सरावात गुंतलेले असल्याचे या संकेतस्थळावर म्हटले आहे. यामध्ये ‘साऊथ चायना सी’च्या पॅरासेल द्वीपसमुहातील दोन तर ‘ईस्ट चायना सी’मधील एका युद्धारावाचा समावेश आहे. तर दक्षिण कोरियाजवळच्या ‘यलो सी’ आणि ‘बोहोई सी’मध्ये देखील प्रत्येकी एक युद्धसराव सुरू आहे. या युद्धसरावाच्या क्षेत्रात सर्व परदेशी जहाजांना प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे. आपल्या नौदलाला युद्धसज्ज ठेवण्यासाठी चीनने याआधीही युद्धसरावाचे आयोजन केले होते. पण गेल्या दोन महिन्यात चार सागरी क्षेत्रात दोन वेळा अशारितीने युद्धसरावांचे आयोजन करण्याची अनोखी घटना ठरते.

पाच युद्धसरावांचे आयोजन

गेल्या महिन्यातही याच चार सागरी क्षेत्रात चीनने एकाचवेळी चार युद्धसरावांचे आयोजन केले होते. आपल्या सागरी क्षेत्राच्या सार्वभौमत्त्वासाठी हा युद्धसराव आयोजित केला जात असून इतर देशांनी यात हस्तक्षेप करू नये, असे चीनने बजावले होते. तरीही अमेरिकेने यापैकी ‘साऊथ चायना सी’च्या सागरी क्षेत्रात युद्धनौका तसेच लांब पल्ल्याचे टेहळणी विमान रवाना करुन चीनला इशारा दिला होता. या हवाई गस्तीवर संताप व्यक्त करुन चीनने अमेरिकेला धमकावले होते. पण पुढच्या काही दिवसांमध्ये आग्नेय आशियाई देशांपैकी फिलिपाईन्स, इंडोनेशियाने चीनच्याच युद्धसराव व या क्षेत्रातील सागरी आक्रमकतेविरोधात ठाम भूमिका घेऊन चीनला आव्हान दिले.

जपानने देखील ‘ईस्ट चायना सी’मधील आपली सागरी गस्त वाढवून तसेच सेंकाकूच्या सागरी क्षेत्रात मच्छिमार नौकांना रवाना करुन चीनला जोरदार प्रत्युत्तर दिल्याचा दावा केला जातो. या व्यतिरिक्त तैवानच्या सागरी तसेच हवाई क्षेत्रातील तणावही वाढत चालला आहे. अमेरिकेने तैवानमध्ये सैन्य उतरविल्यास तैवानच्या चीनमधील विलनीकरणासाठी बळाचा वापर केला जाईल, अशी धमकी चीनच्या सरकारी मुखपत्राने दिली आहे. अमेरिकेने तैवानमध्ये सैन्य उतरविण्याबाबत घोषणा केलेली नाही. तरीही अमेरिका आणि तैवानमधील वाढत्या लष्करी सहकार्याच्या पार्श्वभूमीवर अस्वस्थ झालेल्या चीनकडून या धमक्या दिल्या जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

leave a reply