केंद्र सरकारची ‘स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह’मधून इंधनतेलाच्या निर्यातीकरीता ‘ॲडनॉक’ला मंजुरी

नवी दिल्ली – संयुक्त अरब अमिरातच्या (युएई) अबुधाबी नॅशनल ऑईल कंपनीला (ॲडनॉक) मंगळुरु येथील स्ट्रॅटेजिक इंधनतेल साठवणूक केंद्रात त्यांनी साठविलेल्या इंधनाच्या निर्यातीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यासाठी सरकारने धोरण लवचिक केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत या साठ्यावर पहिला हक्क भारताचा राहणार असला, तरी इतर वेळी या तेलाचा व्यापार ही कंपनी करू शकेल. या निर्णयामुळे भारताच्या स्ट्रॅटेजिक इंधनतेल साठ्यांमध्ये अधिक गुुंतवणूक होईल, असा दावा केला जातो.

'ॲडनॉक'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय देशाच्या इंधन सुरक्षेच्या दृष्टीने लाभदायक ठरेल, असे दावे केले जात आहेत. भारताने आपत्कालीन परिस्थितीत इंधन पुरवठा रोखला गेल्यास वापरता येतील अशा स्ट्रॅटेजिक इंधनतेलाकरीत भूमिगत व्यवस्था केली आहे. देशात विशाखापट्टणम, मंगळुरु, पाडूर आणि ओडिशाच्या चंडीखोल अशा चार ठिकाणी स्ट्रॅटेजिक भूमिगत साठवण केंद्रे आहेत. या भूमिगत टाक्यांमध्ये तेल साठविण्यासाठी भारत निरनिरळ्या कंपन्यांबबरोबर करार करण्याच्या प्रयत्नात आहे.

परदेशातील इंधन कंपन्यांनी या साठवणूक केंद्रात इंधन साठवण केल्यास आपत्कालीन किंवा युद्ध स्थितीत या इंधनावर पहिला हक्क भारताचा राहणार असल्याने एक पैसा खर्च न करता भारताला इंधन सुरक्षा मिळणार आहे. ॲडनॉक बरोबर असाच करार झाला असून यानुसार मंगळुरु येथील स्ट्रॅटेजिक इंधनतेल साठवणूक केंद्रातील ५० टक्के क्षमता या कंपनीने आपले तेल साठविण्यासाठी भाडेतत्वावर घेतली आहे.

'ॲडनॉक'

यानुसार ॲडनॉकने मंगळुरु येथील स्ट्रॅटेजिक इंधनतेल साठवणूक केंद्रात ॲडनॉकने ५० टक्के क्षमता भरली आहे. यातील ३५ टक्के इंधनाची निर्यात करण्यास ॲडनॉकला परवानगी होती. मात्र उर्वरित १५ टक्के इंधनाच्या व्यापारासाठी भारत सरकारच्या परवानगीची आवश्यकता होती. मात्र आता सरकारने ही अट काढून टाकली आहे. यामुळे ॲडनॉकला भारतातील स्ट्रॅटेजिक इंधनतेल साठवणूक केंद्रात अधिक तेल साठविण्यास प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

ॲडनॉकने मंगळुरु प्रमाणे पाडूर येथील स्ट्रॅटेजिक इंधनतेल साठवणूक केंद्रातील ५० टक्के क्षमता भाडेतत्वावर घेण्यासाठी करार याआधी केला आहे. मात्र अद्याप पाडूर येथे आपले इंधन तेल साठविलेले नाही. पण भविष्यात भारत सरकारच्या लवचिक धोरणामुळे ॲडनॉकसह इतर कंपन्याही स्ट्रॅटेजिक इंधनतेल साठवणूक केंद्रात अशी गुंतवणूक करण्यासाठी पुढे येतील असा दावा केला जातो.

कोरोनामुळे जगभरात तेलाची मागणी घसरली होती. तसेच रशिया आणि आखाती देशातील वादामुळे इंधनाच्या किंमती १९ डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत घसरल्या होत्या. यावेळी भारताने आपले सर्व स्ट्रॅटेजिक इंधनतेल साठवणूक केंद्रे स्वस्त इंधन तेलाने भरले आहेत. यामुळे देशाचे ५ हजार कोटी रुपये वाचले होते. यासाठी ३,८७४ कोटी रुपये इतका खर्च आला. या खर्चालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. सध्या अंतरराष्ट्रीय बाजारात इंधन तेलाच्या किंमती ४२ डॉलर्स प्रति बॅरलवर गेल्या आहेत.

leave a reply