नव्या दहशतवादी गटांमुळे वेस्ट बँकमध्ये गोंधळ

- तीन शहरांमध्ये इस्रायलविरोधी दहशतवादी संघटनांचा प्रभाव

वेस्ट बँकजाबा – पॅलेस्टिनी दहशतवाद्यांवरील इस्रायली लष्कराच्या कारवाया वेस्ट बँकच्या प्रमुख शहरांमध्ये नवनवे दहशतवादी टोळ्या निर्माण करीत आहेत. जाबा, जेनिन, हेब्रॉन शहरात हमास, इस्लामिक जिहादच्या धर्तीवर छोटे दहशतवादी गट उभे राहत असल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. या गटांमध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्यामुळे इस्रायलसमोरील आव्हाने वाढत असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था देत आहेत.

गेल्या दोन महिन्यांमध्ये वेस्ट बँक तसेच पूर्व जेरूसलेममधील पॅलेस्टिनी कट्टरपंथीय तसेच दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान 15 ज्यूधर्मियांचा बळी गेला आहे. तर याच काळात इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी वेस्ट बँक व पूर्व जेरूसलेममध्ये केलेल्या कारवाईत 60 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेल्याचा आरोप पॅलेस्टिनी संघटना करीत आहेत. पण यामध्ये दहशतवाद्यांचा सर्वाधिक समावेश होता, असे इस्रायलचे म्हणणे आहे. गाझापट्टीतील हमास, इस्लामिक जिहादचे दहशतवादी आपल्या कारवाईत मारले गेल्याचे इस्रायलने म्हटले होते. पण या कारवाईमुळे वेस्ट बँकच्या शहरांमध्ये छोटे दहशतवादी गट उभे राहत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. हमास, इस्लामिक जिहादच्या धर्तीवर हे गट शस्त्रसज्ज होत आहेत. इस्रायलच्या कारवाईत मारल्या गेलेल्या किंवा अटक झालेल्या दहशतवादी किंवा कट्टरपंथियांच्या नावाने हे छोटे गट उभे राहत आहेत.

30 वर्षांखालील तरुण या गटांमध्ये रायफल्स घेऊन सहभागी होत असल्याचे फोटोग्राफ्स आणि व्हिडिओज्‌‍ समोर येत आहेत. त्यामुळे येत्या काळात गाझापट्टीप्रमाणे वेस्ट बँकमध्येही दहशतवादी संघटना उभ्या राहतील आणि इस्रायलला आव्हान देतील, अशी भीती वर्तविली जात आहे.

दरम्यान, वेस्ट बँकच्या नेब्लस शहरातील ‘लायन्स डेन’ या दहशतवादी संघटनेचा प्रभाव कमी करण्यात यश मिळाल्याचा दावा इस्रायली यंत्रणा करीत आहेत. पण वेस्ट बँकच्या इतर शहरांमध्ये इस्रायलद्वेष्टी दहशतवादी गटांची उभारणी व त्यांना पॅलेस्टिनींकडून मिळणारे समर्थन इस्रायलसाठी धोकादायक ठरतील, असा इशारा इस्रायली विश्लेषक देत आहेत.

leave a reply