युक्रेनमधील युद्धावरून रशियावर आगपाखड करणाऱ्या अमेरिका व युरोपिय देशांना रशियन परराष्ट्रमंत्र्यांचे सडेतोड प्रत्युत्तर

अमेरिका व युरोपियनवी दिल्ली – जी20 परिषदेच्या संयुक्त निवेदनात युक्रेनच्या युद्धाचा समावेश करून यासाठी रशियाचा निषेध करू पाहणाऱ्या पाश्चिमात्य देशांवर रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी घणाघाती टीका केली. इराक, लिबिया, अफगाणिस्तान या देशांमध्ये अमेरिका व नाटोने आक्रमण केले, त्याचा उल्लेख जी20ने कधी केला होता का? असा सवाल करून रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिका व युरोपिय देशांच्य दुटप्पीपणावर नेमके बोट ठेवले. त्याचवेळी जी20 परिषदेत भारताने संतुलित व व्यापक भूमिका स्वीकारल्याचे सांगून परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी त्यासाठी भारताची प्रशंसा केली आहे. तर दुसऱ्या बाजूला अमेरिका व इतर युरोपिय देश रशियावर आगपाखड करताना दिसत आहेत. अशा स्थितीतही जी20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर रशिया व अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये पार पडललेली दहा मिनिटांची चर्चा सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन व रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांच्यामध्ये झालेली ही दहा मिनिटांची चर्चा भारतामुळे झाल्याचे दावे काही वृत्तसंस्थांनी केले आहेत. मात्र भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. युक्रेनचे युद्ध थांबविण्यासाठी भारत सर्वतोपरी आपले योगदान देईल, या भूमिकेवर भारत ठाम आहे. त्याचवेळी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जपान या देशांच्या मागणीनुसार युक्रेनवर हल्ला चढविणाऱ्या रशियाचा निषेध करण्याचा उल्लेख जी20च्या संयुक्त निवेदनात करण्याला भारताने पाठिंबा दिलेला नाही. याचे पडसाद उमटले असून अमेरिकेचे सिनेटर वॉर्नर यांनी आज नाहीतर उद्या भारताला युक्रेनच्या युद्धावर ठोस भूमिका घ्यावीच लागेल, असा दावा केला आहे. तर भारतभेटीवर आलेल्या इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनीही रशियावर टीका करून युक्रेनच्या युद्धाबाबत तटस्थ राहता येणार नाही, असा दावा केला आहे.

युक्रेनवर हल्ला चढविणाऱ्या रशियाचा निषेध न करण्याचा अर्थ पुढच्या काळात आक्रमण करण्याची तयारी करीत असलेल्या उत्तेजन देण्यासारखे ठरते, असा ठपका अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी केला आहे. मात्र अमेरिका व अमेरिकेचे सहकारी देश भारतावर हे दडपण टाकत असताना, रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत तसेच रायसेना डायलॉगमध्ये आपल्या देशाची भूमिका परखडपणे मांडली.

आपल्या देशाच्या सीमेपासून हजारो मैल दूरवर असलेल्या इराक व अफगाणिस्तानवर हल्ला चढवताना, अमेरिका व युरोपिय देशांनी हा आपल्या अस्तित्त्वाचा संघर्ष असल्याचे कारण पुढे केले होते. इराक व अफगाणिस्तानात अमेरिका व नाटोने कितीवेळा मानवाधिकारांचे हनन केले, हा प्रश्न त्यांना विचारला जात नव्हता. कारण या देशात त्यावेळी काय चालले होते, याची कुणालाही पर्वा करण्याची गरजच वाटत नव्हती, असा टोला लॅव्हरोव्ह यांनी लगावला.

मात्र आपल्या शेजारी देशापासून संभवणाऱ्या धोक्याच्या विरोधात रशियाने लष्करी कारवाई केल्यानंतर हेच देश मानवाधिकारांच्या हननाचा मुद्दा उपस्थित करीत आहेत. जर हजारो मैलावर असलेल्या देशांमध्ये तुम्ही आपल्या अस्तित्त्वासाठी संघर्ष पुकारू शकता, तर मग रशिया आपल्या अस्तित्त्वाला संभवणाऱ्या धोक्याविरोधात कारवाई का करू शकत नाही? असा प्रश्न विचारून रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिका व युरोपिय देशांचे वाभाडे काढले.

तुम्ही वाटाघाटी करायला तयार आहात का, हा प्रश्न वारंवार रशियालाच का विचारला जात आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या रशियाशी चर्चा करणे म्हणजे गुन्हा ठरेल, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले होते, त्याचा विचार कुणी का करीत नाही, असा प्रश्नही लॅव्हरोव्ह यांनी माध्यमांना विचारला आहे.

भारताच्या पंतप्रधानांनी जी20च्या या परिषदेला संबोधित करताना अत्यंत संतुलित भूमिका स्वीकारली, असे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह म्हणाले. अमेरिका व पाश्चिमात्य देश युक्रेनच्या युद्धाचा केवळ एक भाग जगासमोर आणण्याचा प्रयत्न करीत असून रशियाविरोधात चित्र उभे करीत आहेत. पण पंतप्रधान मोदी यांनी व्यापक दृष्टीने या समस्येकडे पाहिलेले आहे, अशी प्रशंसा लॅव्हरोव्ह यांनी केली. याबरोबरच भारत आणि रशियाचे संबंध नेहमीच विशेष राहिलेले आहेत, असे सांगून या द्विपक्षीय संबंधांचे महत्त्व लॅव्हरोव्ह यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहेत.

leave a reply