उत्तराखंडने आणीबाणीच्या काळात संपर्क साधण्यासाठी ‘क्यूडीए’ यंत्रणा उभारली

देहराडून – आपत्कालीन परिस्थितीत उत्तराखंडमधील दुर्गम भागात संपर्क कायम रहावा यासाठी उत्तराखंडने ‘क्विक डिप्लॉयबल अँटिना’द्वारे (क्यूडीए) सपंर्क यंत्रणा उभारली आहे. ‘क्यूडीए’द्वारे सॅटेलाईटच्या माध्यमातून संपर्क करता येईल. ‘क्यूडीए’वर आधारित संपर्क यंत्रणा उभारणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

उत्तराखंडच्या सीमा चीन आणि नेपाळला भिडलेल्या असून या भागात चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. येथील दुर्गम भागात भारतीय दूरसंचार नेटवर्क मिळत नसल्याने ग्रामस्थांकडून नेपाळी दूरसंचार कंपन्यांच्या सिम कार्डचा वापर करीत असल्याचे काही महिन्यनापूर्वी समोर आले होते. यापार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारने उभारलेल्या ‘क्यूडीए’ संपर्क यंत्रणेचे महत्व अधोरेखित होते.

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी या यंत्रणेचे उद्‌घाटन केले. ‘क्यूडीए’ या यंत्रणेचा वापर आपत्कालीन परिस्थितीत निमलष्करी दल आणि ‘राष्ट्रीय आपत्ती निवारण दल’कडून (एनडीआरएफ) केला जातो. पहिल्यांदाच देशातल्या एका राज्याने ही यंत्रणा उभारल्याने त्याचे महत्त्व वाढले आहे. नेटवर्क आणि इतर संपर्क साधनांची समस्या असलेल्या दुर्गम भागात ‘क्यूडीए’ यंत्रणा फायदेशीर ठरणार आहे. उत्तराखंडमध्ये आपत्तकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास ‘क्यूडीए’ यंत्रणेच्या माध्यमातून व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल्स केला जाऊ शकतो. तसेच सिग्नल्स पोहोचत नसलेल्या ठिकाणीही ही यंत्रणा यशस्वीरीत्या डेटा ट्रान्सफर करते.

‘सॅटीक’ आणि ‘मोबाईल’ अशा दोन प्रकारच्या यंत्रणा आहेत. सॅटीक ‘क्यूडीए’ देहराडूनच्या ‘स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अॅथॉरिटी’ मध्ये आणि इतर प्रमुख ठिकाणी उभारली जाईल. तर मोबाईल ‘क्यूडीए’ हेलिकॉप्टरच्या सहाय्याने आपत्तकालीन ठिकाणी नेता येईल. या ‘क्यूडीए’ यंत्रणेच्या यशस्वी चाचण्या झाल्याचे वरिष्ठ सरकारी अधिकारी म्हणाले. तसेच संपर्क नसलेल्या भागांमध्ये २४८ सॅटेलाईट फोन्सचे वाटप करण्यात आले. या सॅटेलाईट फोन्सच्या माध्यमातून आपत्कालीन आणि आणीबाणीच्या काळात मोबाईल कनेटिव्हिटीच्या शिवाय दुर्गम भागातल्या जनतेशी संवाद साधणे सोपे होणार आहे.

leave a reply