लष्करप्रमुखांनी अंबाला तळाला भेट देऊन युद्धसज्जतेचा आढावा घेतला

नवी दिल्ली सोमवारी लष्करप्रमुख जनरल मनोज मुंकूद नरवणे यांनी हरियाणाच्या अंबाला तळावरील लष्कराच्या ‘ खड्ग कोर ‘च्या जवानांची भेट घेऊन युद्धसज्जतेचा आढावा घेतला. तसेच भविष्यात कुठल्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश लष्करप्रमुखांनी यावेळी दिले. त्याचवेळी जनरल नरवणे यांनी अंबालाच्या वायुसेनेच्या तळाला देखील भेट दिली आणि ‘रफायल’ लढाऊ विमानाची पाहणी केली. लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर आणि जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर तणाव वाढलेला असताना लष्करप्रमुखांची ही अंबाला भेट अत्यंत महत्त्वाची ठरते.

लष्करप्रमुखांनी अंबाला तळाला भेट देऊन युद्धसज्जतेचा आढावा घेतलालष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी अंबाला तळावर तैनात ‘खड्ग’ कोरच्या जवानांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढविले. ‘खड्ग कोर ‘ भारतीय लष्करातील ही सर्वात घातक कोर मानली जाते.१९७१च्या भारत पाकिस्तान युद्धात या कोरने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. काली मातेचे ‘खड्ग’ शस्त्र या कोरचे प्रतिकचिन्ह आहे. सीमेपलीकडील शत्रूंना गारद करण्याची क्षमता या ‘खड्ग’ कॉर्प्समध्ये आहे. जनरल नरवणे यांनी या कोरच्या जवानांची भेट घेऊन युद्धसज्जतेचा आढावा घेतला. तसेच कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन लष्करप्रमुखांनी यावेळी केले. भारत एकाचवेळी पाकिस्तान आणि चीन या दोन्ही आघाड्यांवर लढण्यास सज्ज असल्याचा संदेश जनरल नरवणे यांनी या भेटीतून दिला.

लष्करप्रमुखांनी अंबाला तळाला भेट देऊन युद्धसज्जतेचा आढावा घेतलाभारताने फ्रान्सकडून खरेदी केलेली ‘रफायल‘ लढाऊ विमाने अंबालाच्या वायुसेना तळावर तैनात आहेत. जनरल नरवणे यांनी या रफायल विमानांचीही पाहणी केली. दरम्यान, ‘रफायल’ विमानांचा वायुसेनेतील समावेश हा भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्या शत्रूला धडकी भरविणारा ठरतो, असे विधान संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केले होते. तसेच देशाच्या सीमेवरील निर्माण झालेली सुरक्षाविषयक परिस्थिती लक्षात घेता रफायलचा समावेश योग्य वेळीच झाल्याचे वायुसेना प्रमुख एअर चिफ मार्शल भदौरिया म्हणाले होते. थोडक्यात या रफायल विमानांचा वापर कारवाईसाठी होऊ शकतो, असे संकेत वायुसेनाप्रमुखांनी दिले होते. या सर्व पार्श्वभूमीवर जनरल नरवणे यांनी अंबाला तळाला भेट देऊन राफायलची केलेली पाहणी लक्ष वेधून घेणारी आणि चीन आणि पाकिस्तानला संदेश ठरते.

leave a reply