संरक्षणदलप्रमुख जनरल रावत जम्मू-काश्मीरच्या भेटीवर

श्रीनगर – भारताचे संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत दोन दिवसांच्या जम्मू-कश्मीर दौऱ्यावर आहेत. त्यांनी रविवारी पाकिस्तानला लागून असलेल्या नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा आढावा घेतला. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार सुरु असून भारतीय जवानांकडून त्याला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. त्याचवेळी पीओकेमध्येही हालचाली वाढल्या आहेत. नुकतेच चीन पाकिस्तानला पीओकेमध्ये क्षेपणास्त्र यंत्रणा बसविण्यास सहाय्य करीत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. यापार्श्वभूमीवर संरक्षणदलप्रमुख जनरल रावत यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याचे महत्व अधिकच वाढले आहे.

रविवारी संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी जम्मूच्या नागरोटामधील लष्कराच्या १६ कोरच्या मुख्यालयाला भेट दिली त्यांच्यासोबत नॉदर्न आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल वाय.के. जोशी देखील उपस्थित होते. १६ कोरचे लेफ्टनंट जनरल हर्ष गुप्ता यांनी नियंत्ररेषेवरील परिस्थिती आणि लष्कराच्या सज्जतेची संरक्षणदलप्रमुखांना माहिती दिली. एकाचवेळी दोन्ही आघाड्यांवर युद्धाची शक्यता विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी जनरल रावत यांनीही भारत एकाचवेळी चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवर लढण्यास सज्ज असल्याचे बजावले होते. चीन आघाडीवर मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरु असताना पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवरही भारताने जय्यत तयारी केल्याचे संकेत यातून मिळत आहेत.

दरम्यान, शनिवारी रात्री जम्मू- काश्मीरच्या नियंत्रणरेषेवरील पुंछ जिल्ह्याच्या मनकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराने गोळीबार करुन भारतीय लष्कराला चिथावणी दिली. त्यानंतर भारताच्या सुरक्षा दलाने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे चार जवान ठार झाल्याचे वृत्त आहे. तसेच सुरक्षा दलाने पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या उडविल्या. या संघर्षात बीएसएफचे दोन जवान जखमी झाले.

याआधी गुरुवार -शुक्रवारी जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रणरेषेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये जोरदार गोळीबार झाला होता. यात मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानचे जवान जखमी झाले होते. या जवानांवरील उपचारांसाठी पाकिस्तानकडे वैद्यकीय सहाय्य उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. तरीही नियंत्रणरेषेवरील पाकिस्तानी लष्कराचा गोळीबार थांबलेला नाही. रविवारी संध्याकाळी देखील पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये संघर्षबंदीचे उल्लंघन केले. तर सुंदरबनी सेक्टरमध्येही पाकिस्तानने गोळीबार केला.

leave a reply